You are currently viewing ‘सेवा संकल्प, आरोग्याचा ध्यास!’; मळेवाड येथे मोफत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Oplus_16908288

‘सेवा संकल्प, आरोग्याचा ध्यास!’; मळेवाड येथे मोफत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; नामांकित रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार

सावंतवाडी : ‘सेवा संकल्प, आरोग्याचा ध्यास!’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून मळेवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला थेट गावातच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोफत आरोग्य शिबिरांची मालिका सुरू करण्यात आली आहे. मळेवाड येथून या जनसेवा मोहिमेची सुरुवात झाली.

या शिबिरासाठी राज्यातील नामांकित वैद्यकीय संस्थांचे विशेष सहकार्य लाभले. यामध्ये रुबी हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, अथायु हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल या आघाडीच्या रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी करून मोफत सल्ला व उपचार दिले.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मंडळ अध्यक्ष मधु देसाई, उपसभापती गौरव मुळीक, हेमा मराठे, पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे, पंचायत समिती सदस्य अंकित धाऊस्कर, अण्णा झाटये, दादा परब, सिद्धेश नाईक, किरण पाल्येकर, नारायण कांबळी, सिद्धेश कांबळी, किसान मोर्चा अध्यक्ष केशव नाईक, ओंकार आजगावकर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला वाढदिवस केवळ औपचारिक पद्धतीने साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा विशाल परब यांचा प्रयत्न कौतुकास्पद ठरला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना गावातच दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा