पुणे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार)
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण)’ अंतर्गत पहिल्या बॅचच्या फेलोंचे संशोधन पोस्टर सादरीकरण रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात उत्साहात पार पडले. हे पोस्टर सादरीकरण “महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद यांच्या सहकार्याने पार पडले. कोथरूड येथील जे. पी. नाईक सेंटर फॉर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट येथे दुपारी २:३० ते सायं. ६:३० या वेळेत झालेल्या या प्रदर्शनात अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सीडीपीओ (CDPO) आणि बालशिक्षण कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभवांवर आधारित केलेल्या संशोधनाची मांडणी केली. दैनंदिन कामातील आव्हाने, निरीक्षणे, प्रयोग व निष्कर्ष यांना शास्त्रीय जोड देऊन शैक्षणिक प्रश्नांकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचे प्रभावी व्यासपीठ या उपक्रमामुळे उपलब्ध झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुषमा पाध्ये यांनी महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या कार्यपद्धतीची ओळख करून देत बालकेंद्रित शिक्षणासाठी कार्यकर्त्यांना संघटित करण्यावर भर दिला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी फेलोशिपची उद्दिष्टे विशद करत क्षेत्रीय संशोधनाचे महत्त्व स्पष्ट केले. या वेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व समस्यांवर एकाच वेळी काम करण्याऐवजी विशिष्ट प्रश्नाची निवड करून वर्षभर सखोल अभ्यास करावा आणि प्रत्यक्ष हस्तक्षेप व सततच्या सुधारणांतून संशोधनाचा प्रभाव वाढवावा, असा सल्ला त्यांनी दिला. या वेळी झालेल्या सत्रांमध्ये बालशिक्षणातील संशोधनाची सांगड थेट शासन-प्रशासनाच्या धोरणांशी घालण्यावर आणि आगामी काळात राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यावर सविस्तर चर्चा झाली. शेवटी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाचे प्रमुख योगेश कुदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रदर्शनात फेलोंनी सादर केलेल्या संशोधन पोस्टर्सना अभ्यासक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी फेलोंशी थेट संवाद साधून विविध संकल्पना व प्रत्यक्ष निष्कर्षांची माहिती घेतली. या वेळी डॉ. माधव सूर्यवंशी, नेहा कुलकर्णी, महेंद्र गणपुले, अजित तिजोरे, वृषाली देहाडराय यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, मार्गदर्शक आणि अभ्यासक उपस्थित होते; तसेच बालशिक्षण विषयक पुस्तकांचे दालनही येथे उभारण्यात आले होते. प्रत्यक्ष अनुभवांना संशोधनाची जोड देत धोरणात्मक बदलांची दिशा दाखवणारा हा उपक्रम ‘अनुभवातून प्रश्न, संशोधनातून उत्तर आणि समन्वयातून परिवर्तन’ या मूल्यांना बळ देणारा आणि बालशिक्षण क्षेत्राच्या पुढील वाटचालीत मोलाचा टप्पा ठरला.
