२१ सामाजिक संस्थांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत
छत्रपती संभाजीनगर / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
तळागाळात विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना समाज, दाते आणि उद्योगविश्वाशी जोडत त्यांच्या कार्याला व्यापक पाठबळ मिळवून देण्याच्या उद्देशाने माणुसकी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘दान उत्सव ५.०’चा उत्साहात समारोप झाला. दोन दिवसांच्या या उपक्रमात विविध क्षेत्रांत कार्यरत २१ सामाजिक संस्थांनी सहभागी होत आपल्या कार्याची माहिती नागरिक, दाते, उद्योग प्रतिनिधी आणि स्वयंसेवकांसमोर मांडली.
या समारोप सोहळ्याचे प्रमुख अतिथी अदानी इन्फ्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. राव, पगारिया फाउंडेशनचे प्रमुख पुखराज पगारिया, मेटलमन ऑटोचे संचालक श्रीकांत मुंदडा, तसेच माणुसकी फाउंडेशनचे मार्गदर्शक नाना आगलावे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, दाते, स्वयंसेवक आणि सहभागी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दान उत्सवाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या २१ सामाजिक संस्थांना माणुसकी फाउंडेशनतर्फे प्रत्येकी १ लाख रुपये, अशी एकूण २१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. सामाजिक संस्थांच्या सातत्यपूर्ण कार्याला आर्थिक आधार देतानाच त्यांना अधिक सक्षम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे माणुसकी फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.
याव्यतिरिक्त यावेळी के. एस. राव यांनी पत्नी सुनीता यांच्या वतीने माणुसकी फाउंडेशनला १० लाख रुपयांची देणगी जाहीर केली. समाजाला आपण काहीतरी परत देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून भविष्यातही सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
दान म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे
समारोपाच्या वेळी वक्त्यांनी दानाची व्याप्ती केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसल्याचे अधोरेखित केले. वेळ, कौशल्य, ज्ञान, वस्तू, आर्थिक मदत आणि स्वयंसेवा या विविध माध्यमांतून प्रत्येक व्यक्ती सामाजिक कार्यात योगदान देऊ शकते, असा संदेश देण्यात आला.
सामाजिक संस्थांना केवळ निधी देण्याऐवजी त्यांना संस्थात्मकदृष्ट्या सक्षम करण्यावर माणुसकी फाउंडेशनचा भर असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. लेखापरीक्षण, पारदर्शकता, कायदेशीर अनुपालन, व्यवस्थापन, प्रभाव मोजणी आणि संस्थात्मक प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन देऊन सामाजिक संस्थांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न पुढेही केला जाणार आहे.
पुखराज पगारिया यांनी सामाजिक कार्यातील सातत्य आणि समाजाशी असलेल्या बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले. १९७५ पासून व्यवसायासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देत असल्याचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला. सामाजिक कार्याचा प्रभाव अधिक व्यापक करण्यासाठी मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दान आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व सांगणारे वक्ते सहभागी करून घेण्याची आणि पुढील वर्षी कार्यक्रमाची व्याप्ती अधिक मोठी करण्याची सूचना त्यांनी माणुसकी फाउंडेशनला केली. अशा माध्यमातून सामाजिक कार्याचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून दानाची आणि सामाजिक सहभागाची संस्कृती अधिक मजबूत करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
मेटलमन ऑटोचे संचालक श्रीकांत मुंदडा यांनी समाजसेवा म्हणजे केवळ आर्थिक मदत नसून सामाजिक संस्थांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्य, मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे असल्याचे सांगितले. उद्योगक्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना, दिव्यांग व्यक्तींसह, उपलब्ध संधींच्या माध्यमातून मदत करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली.
मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग
दान उत्सवाच्या दोन दिवसात सुमारे ३,००० नागरिकांनी भेट देत विविध सामाजिक संस्थांच्या कार्याची माहिती घेतली. दोन दिवसांत नागरिक, स्वयंसेवक, दाते, उद्योग प्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक संस्थांना एकत्र आणून त्यांच्या कार्याला समाजातील विविध घटकांचे सहकार्य मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे संयोजन समितीने सांगितले.
“समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना आपण एकट्या सोडायच्या नाहीत; त्यांच्या कार्याला समाजाची साथ, उद्योगांचे सहकार्य आणि दात्यांचा विश्वास मिळवून देणे हीच दान उत्सवामागची भूमिका आहे,” असा संदेश समारोपाच्या वेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभय हंचनाळ, स्वप्नील कुलकर्णी, नाना आगलावे, मुकुंद कुलकर्णी, गजानन देशमुख आणि संयोजन समितीतील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
————————————————
सहभागी संस्थांनी व्यक्त केला कृतज्ञतेचा सूर
सामाजिक कार्याच्या प्रवासातही अनेकदा नकार, अडचणी आणि आव्हाने येतात; मात्र त्यातून खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहणे आणि मिळणाऱ्या प्रत्येक छोट्या सहकार्याबद्दल कृतज्ञ राहणे, हा या अनुभवातून मिळणारा महत्त्वाचा संदेश असल्याचे इन्फांट इंडियाचे दत्ताभाऊ बारगजे यांनी सांगितले.
दान उत्सवात सहभागी झालेल्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी माणुसकी फाउंडेशनसोबतच्या अनुभवांबद्दल मनोगत व्यक्त करताना आर्थिक मदतीसोबतच मार्गदर्शन, विश्वास आणि संस्थात्मक क्षमता-विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.
दीनदयाल नवरचना प्रतिष्ठान, डोंबरीचे अश्विनजी भोंडवे यांनी सांगितले की, माणुसकी फाउंडेशन गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या संस्थेसोबत उभे आहे. संस्थेला कमिन्स इंडिया शी जोडण्यात आल्याने ऑडिट रिपोर्ट , पारदर्शकता, आणि इम्पॅक्ट मोजणी यांसारख्या महत्त्वाच्या संस्थात्मक बाबींवर काम करण्याची संधी मिळाली. सामाजिक कार्याला सेवाभावासोबतच योग्य ज्ञान, व्यवस्थापन आणि क्षमता-विकासाची जोड आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अन्नामृत फाउंडेशनचे सुदर्शन पोटभरे यांनी कोविड काळात लाखो गरजू नागरिकांना अन्न पुरविण्यापासून दान उत्सवातील सहभागापर्यंतचा संस्थेचा प्रवास सांगितला. दान उत्सवाच्या सुरुवातीच्या टप्प्यात केवळ सहभागी संस्थांचे सादरीकरण ऐकणाऱ्या भूमिकेतून पुढे लाभार्थी आणि आता सहकारी संस्थेच्या भूमिकेकडे झालेला प्रवास त्यांनी अधोरेखित केला. यंदा त्यांच्या स्टॉलवर जमा झालेली संपूर्ण देणगी माणुसकी फाउंडेशनला देण्याची घोषणाही त्यांनी केली.
