माजगाव गरड येथे आठ फुटी अजगर पकडला
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठी कसरत; अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडले
सावंतवाडी
माजगाव गरड येथील देवाची महिमा बिल्डिंगमध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्या रूपा मुद्राळे यांच्या घराजवळ तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळून आला. अजगर दिसून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली.
अजगराला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वनविभागाचे कर्मचारी आर. आर. टी. शुभम कळसुलकर व गोपाळ सावंत यांनी मोठी कसरत करत अजगराला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे, देवा मुद्राळे, श्याम बांदिवडेकर, माजी सरपंच रिची मयेकर तसेच वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
