You are currently viewing नगरपालिका शाळेत स्वच्छता जनजागृती 

नगरपालिका शाळेत स्वच्छता जनजागृती 

विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

विटा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२६ व माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत शहरात ‘स्वच्छता ही सेवा’ व ‘सेवा संकल्प’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागरिक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक घटकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व कचरा व्यवस्थापना बाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विटा नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर, शाळा क्र. ३, विटा येथे स्वच्छता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्य सभापती भालचंद्रभैय्या कांबळे व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात विटा नगरपरिषदेचे माहिती, शिक्षण व जनजागृती (IEC) विभागप्रमुख नितीन चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, शाळा परिसर स्वच्छता, वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैली याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नितीन चंदनशिवे म्हणाले की, स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. घर, शाळा आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी लहान वयातच स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आत्मसात केल्यास भविष्यात स्वच्छ व सुंदर शहर निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी शिंदे, मुख्याध्यापिका मिनाक्षी पाटकुळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा