You are currently viewing वेंगुर्ल्यात सुसज्ज सायन्स सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करणार; दीपक केसरकरांची ग्वाही
Oplus_16908288

वेंगुर्ल्यात सुसज्ज सायन्स सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करणार; दीपक केसरकरांची ग्वाही

जिल्हास्तरीय विज्ञान-नाट्य महोत्सवाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून विज्ञान क्षेत्रात योगदान द्यावे, केसरकरांचे आवाहन

वेंगुर्ला : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान-नाट्य महोत्सवाचे महत्त्व मोठे असून, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून भविष्यात विज्ञानाच्या क्षेत्रात योगदान द्यावे. गोव्यातील सायन्स सेंटरच्या धर्तीवर सिंधुदुर्गात, विशेषतः वेंगुर्ल्यात सुसज्ज सायन्स सेंटर उभारण्यासाठी जिल्हा व राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे दिली.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ल्यात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान-नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, विजय नाईक, तहसीलदार ओंकार ओतरी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सचिन वालावलकर, पप्पू परब, बाळा दळवी, पंचायत समिती सदस्य साक्षी नार्वेकर, विष्णू फणसेकर, शितल राऊत, सुचिता वजराटकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, प्राचार्य राजेंद्र कांबळे, नगरसेवक प्रणव वायंगणकर, सुधीर पालयेकर, गौरी माईणकर, रिया केरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, विस्तार अधिकारी संतोष गोसावी, वसंत तांडेल, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, अजित राऊळ, हर्षद डेरे, तुषार साळगावकर, जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष श्री. काकतकर यांच्यासह अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध विषयांवर विद्यार्थ्यांचे प्रभावी नाट्यप्रयोग

तालुकास्तरीय स्पर्धेतून जिल्हास्तरावर आलेल्या विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहने, अंतराळीय अधिवास, अंतराळातील मानवी वस्ती, महासागराचे पुनर्जीवन व पुढील पिढ्यांसाठी त्याचे संवर्धन अशा विविध विषयांवर प्रभावी नाट्यप्रयोग सादर केले.

केसरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अशा महोत्सवांचे विशेष महत्त्व आहे. स्वतंत्र निधीची तरतूद नसतानाही सर्वांचे सहकार्य घेऊन हा उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांचे त्यांनी अभिनंदन केले.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल म्हणाले की, विज्ञान हा केवळ पाठ्यपुस्तकातील विषय नसून दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ‘एखादी गोष्ट कशी घडते?’ या प्रश्नातून विज्ञानाची सुरुवात होते. विज्ञानामुळे समाजात सकारात्मक बदल झाले असले तरी त्याच्या गैरवापरातून निर्माण होणाऱ्या परिणामांचाही विचार होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले असून पाणी बचत व संवर्धनासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंधारे उभारण्याचे काम सुरू असून, विद्यार्थ्यांनीही गाव, वाडी-वस्ती व घराच्या परिसरात पाणी अडविणे-जिरविण्याच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन साईल यांनी केले.

विज्ञानातून भविष्यातील वैज्ञानिक घडावेत – प्रितेश राऊळ

आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी विज्ञान-नाट्य महोत्सवामागील भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना विज्ञानाचे विविध पैलू प्रत्यक्ष अनुभवता यावेत आणि वैज्ञानिक विचारांना चालना मिळावी, यासाठी यावेळी महोत्सव व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने घेण्यात आलेल्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विमानाने इस्रोची सफर घडवून आणण्यात आली. रॉकेट लॉन्चिंगसह विज्ञानाच्या संकल्पना प्रत्यक्ष पाहून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक होण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, हा त्यामागील उद्देश होता. विज्ञान-नाट्य महोत्सवातून विद्यार्थ्यांना विभागस्तरावर प्रतिनिधित्वाची संधी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी शिक्षण विभागाच्या विज्ञानविषयक उपक्रमांचे कौतुक केले. तालुक्यातील माध्यमिक शाळांनी स्पर्धेत सहभाग घेत विविध विषयांवर प्रभावी सादरीकरण केल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे यांनी केले.

वेंगुर्ल्यात सायन्स सेंटरसाठी प्रयत्न

गोवा सायन्स सेंटरच्या धर्तीवर वेंगुर्ल्यात सुसज्ज सायन्स सेंटर उभारण्याची गरज असून, यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा प्रितेश राऊळ यांनी व्यक्त केली.

यावर केसरकर यांनी आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सायन्स सेंटरसाठी निधी मंजूर केला होता, असे सांगितले. वेंगुर्ला नगरपालिकेने सायन्स सेंटरसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असून, जिल्हा निधी तसेच राज्य शासनाच्या उपलब्ध निधीतून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा