*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*माझी खाद्य संस्कृती*
( भाग-१०)
बेंगलोर उत्तरार्ध
या शहराचं क्लायमेट थेट नासिक सारखं, हिरवाई आणि पर्जन्यमान सुद्धा नासिक सारखेच,किंबहुना थोडेसे अधिकच चांगले.
शहराच्या मधोमध २४० एकरांवर वसलेलं लालबाग बोटॅनिकल गार्डन, त्यात शिरल्यावर जाणवतही नाही कम्पाउंडच्या बाहेर एक विस्तीर्ण शहर वसलय म्हणून.
पण,पार्क बघायचं तर लालबाग बोटॅनिकल गार्डन,२४० एकरांवर पसरलेलं,एक नंबर आहे ते.
इथं वनस्पती शास्राच्या अभ्यासकाने जरुर जावे.
काय ते एक एक वृक्ष, हे एव्हढे मोठ्ठे मोठ्ठे त्यांचे बुंधे.त्या प्रत्येकाची माहिती त्यावरच लिहिलेली.प्रत्येक झाडाचे नाव,व्युत्पत्ती,इतिहास भूगोल सर्व काही.
बनेरघट्टाला सुद्धा एक गार्डन आहे
Bannerughatta National Park
पार्क आहे पण तिथं वन्यजीव आणि प्राणी दर्शन जास्त आहे.पक्षी,जलचर तर आहेच आहे शिवाय झेब्रा, मोर आणि त्यांचे प्रवर्ग.पांढरा मोर तिथंच मी सर्व प्रथम बघितला.
झेबऱ्याच्या अंगावरचे पट्टे जवळून पाहिले, अदभुत.
सिंह, वाघ,हरणं बंदिस्त आणि सुरक्षित गाडीत बसून अगदी जवळून पाहिले.
पक्षी तर किती प्रकारचे विचारुच नका ! त्यांचेसाठीचे पिंजरे, पिंजऱ्यातील पाणथळ जागा, घरटं बांधण्याच्या जागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना पूर्ण पंख उघडून विहार करण्याची सोय.
सर्व काही अगदी व्यवस्थित योजनाबद्ध पण बंदिस्त पिंजरे.
इथं जायला मॅजेस्टिक वरुन तिनशेपासष्ट बस पकडायची.
चित्रपट आणि त्यातील कलाकार यांची दक्षिण भारतियांना भलतीच क्रेझ आहे किंबहुना भुरळच आहे.
भुरळ तरी किती असावी, काही मर्यादा ?
राजकुमार नावाचा एक चित्रपट अभिनेता वारला,नैसर्गिक मृत्यू झाला होता त्याचा.
त्यावेळी आम्ही तिथंच होतो, त्याचे पार्थिव गब्बन पार्कच्या समोरच्या एका हॉल मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.प्रचंड गर्दी होती त्याचे दर्शन घेण्यासाठी.
त्या प्रसंगी चेंगराचेंगरी इतकी, झाली विचारूच नका.
ती गर्दी कंट्रोल करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांला इतका चोप दिला की त्याचा मृत्यू झाला आणि तीन दिवस कर्फ्यु लागला ना राव !
नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे किंवा येणार असेल तर तीन चार मजली उंचच उंच चित्रपटातील कलाकारांची कटआऊट किंवा होर्डिंग्ज उभारण्यात येतात मग त्यांना माळा लायटिंग काही विचारु नका.
याशिवाय चित्रपटातील समूह नृत्य रस्तोरस्ती करून दाखवतात अर्थात मुख्य कलाकारांना वगळून.
पदन्यास म्युझिक वगैरे सर्व काही सेम आणि लाइव्ह बरे !
नासिकला फारा वर्षांपूर्वी चित्रपटाची पोस्टर्स रस्त्याने बँड लावून फिरवायचे ना तसे !
हे शहर आणि शहरवासीय खूपच धार्मिक.बहुतेक दुकानांच्या फळ्यांवर त्रिपुंड्र दर्शविणारे तीन आडवे पट्टे किंवा रेषा असतात.सकाळी बहुतेक जण कपाळावर त्रिपुंड लावून जवळपासच्या मंदिरांत जाणार म्हणजे जाणारच.
इथली आंबेडकर रोडवरील विधानसौंदा म्हणजे विधानसभा, जनरल पोस्ट ऑफिस,कोर्ट, लायब्ररी इ. सुन्दर स्थापत्य शास्राची उदाहरणे आहेत,बघितलीच पाहिजे अशी.
(त्या वास्तू पाहिल्यावर वाटते, इथले तुरुंगही सुंदर असतील,)
नाही नाही! योग नाही आला तिथं जाण्याचा!
आधुनिक सोयी सुविधा ह्या शहराने सहज स्विकारल्या.
जसे:
रस्तोरस्ती हवामान संबंधी दिलेली माहिती
बस स्टोपवरचे ओव्हर ब्रिज, अंडर वेज
ब्रिजखाली असलेले करंट टेम्परेचर दर्शक
पेड युरिनल
चिकपेट मध्ये अनेक सुंदर सुंदर मंदिरे आहेत.
जाधवबुवांनी ती शोधली होती.तिथं जाऊन ते पखवाज वाजवायचे आणि त्यांना येत असलेली भजने चक्क मराठीत म्हणायचे.त्यांची खूपच जवळीक निर्माण झाली होती तिथे.
सर्व साधारण पणे बहुतेक मंदिरात नवग्रह देवतेचं ठिकाण असतेच असते.
प्रत्येक ग्रहाची मूर्ती त्या त्या म्हणजे योग्य त्या दिशेला तोंड करून असते.
मॅजेस्टिक एरियात एका मंदिरात तर नवग्रह पूजनाचे ठिकाणी मूर्ती नसून त्या त्या ग्रहांची झाडे लावली आहेत, अगदी त्या त्या ग्रहांच्या स्थानी.त्या त्या झाडांवर त्या त्या ग्रहांची नावे लिहिलेली आहेत, म्हणून समजते ते.
इथे गल्लीबोळात देवादिकांच्या पालख्या, मिरवणुका काढण्याच्या प्रथा आहे, ते ही भर वस्तीत वा भर बाजारपेठेत म्हणा ना!
गल्ली बोळ लहान असल्याने त्या पालख्या व्यवस्थित फोल्ड करणाऱ्या असतात हे एक विशेष.
हे शहर तसं धार्मिक, अजूनही ती परंपरा त्याने जपली आहे.गल्लीबोळात सुंदर सुंदर मंदिरं आहेत. जाधवबुवा(आज ते आपल्यात नाहीत)जर ग्रुपमध्ये असतील तर एक वेगळाच माहोल असायचा.
ह्या माणसाला मंदिरं शोधून काढायचा जणू छन्दच.
मंदिराप्रमाणे निरनिराळे खाण्याचे पदार्थ शोधायचे आणि सर्वांना तिथं पर्यंत घेऊन जायचाही छंद.
जाधवबुवा किंवा देवराम सोनवणे आणि पगारे बरोबर असतील तर श्रीनिवास च्या रुममध्ये खाली चादर अंथरूण संध्याकाळी आम्ही सर्व जण हरिपाठ म्हणायचो.
हरिपाठ नंतर आरती, प्रसाद म्हणून केळी.(नेहमी केळी का ?, म्हणून मी टीका केली आणि पेढे आणायला गेलो तेंव्हा भाव समजला बेंगलोरमध्ये पेढ्यांचा भाव पाहिला आणि केळीच बरे म्हणालो.)
बेंगलोर म्हैसूर रस्त्यावर श्री श्री रविशंकर यांचा आश्रम आहे.काय परिसर आहे.ध्यानमंदिर तर अतिसुंदर.दुपारचं जेवण अगदी सात्विक आणि नीटनेटके.
ह्याच रस्त्यावर एके ठिकाणी दीड बाय दीड किलोमीटर पसरलेला वटवृक्ष आहे.
(मूळ वृक्ष अस्त झालाय त्या जागी आज एक शिवलिंग आहे पण त्यापासुनच्या पारंब्यांनी वाढणं चालूच ठेवलंय.)
तिथे एक बोर्ड लावलेला आहे.
“This banyan tree area is maintain by Bank of Maharashtra”
छाती अभिमानाने फुलून आली.
बंगलोर शहरच असं आहे त्याबद्दल किती तरी सांगता येईल म्हणून पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांत विस्तार झाला. आशा आहे तुम्हाला ही बेंगलोरची मुशाफिरी आवडली असेल.
–राजा जोशी
9823687519
🌱 🌱 🌱 🌱 🌱 🌱
