You are currently viewing बेंगलोर पूर्वार्ध

बेंगलोर पूर्वार्ध

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*माझी खाद्य संस्कृती* (भाग-०९ )

*बेंगलोर पूर्वार्ध*

 

*बेंगलोर* म्हणजे *हॉटेल श्रीनिवास, चिकपेट आणि मॅजेस्टिक परिसर*

*बेंगलोर* चं *बेंगळुरू* झालं नव्हतं तेंव्हा पासून आम्ही तिथं जायचो अगदी एक एक महिनाभरासाठी,कमीतकमी.

प्रत्येक वेळी जाणवायचं हे शहर तुम्हांला आपलंसं करून घेतं आहे असं.

 

म्हणजे बघा,

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत तुम्ही नाचला नाही, हरकत नाही पण ती पाहण्यासाठी जरी तुम्ही गेलात तरी एक हलकासा गुलालाचा थर अंगावर चढतो, अगदी कळत नकळत.

तसाच एक हलकासा काळसर थर तुमच्या त्वचेवर चढतो सहजपणे पहिल्या आठवड्यात.

आणि नकळत तुम्ही *बेंगलोर* चे *स्थानिक रहिवासी* असल्यागत दिसू लागतात.

अर्थात हे भाग्य *ऑन लाईन घरी बसून किंवा ए सी ऑफिसमध्ये बसणाऱ्यांना* नाही मिळणार, त्यासाठी आमच्यासारखं *अंडर ओपन स्काय* काम करावं लागेल, तेंव्हा हा अनुभव येतो.

 

सकाळी उठल्यावर चहा कुठे घ्यायचा हा प्रश्नच नाही.चहा घ्यायचा तो *महालक्ष्मी हॊटेल* च्या तळमजल्यावर म्हणजे *मायनस १ फ्लोअर* बरे !.

तिथे सर्व दुकानेच दुकाने पण ती उघडण्यापूर्वीच अगदी दिवसही उजाडण्यापूर्वी चहा विक्रीचा स्टोल लागायचा आणि नऊ दहा वाजण्याच्या आंत सर्व स्वच्छ करुन तो ओनर निघून पण जायचा.

चव म्हणाल तर एक नंबर.दोन कप नव्हे नव्हे दोन ग्लास सहज पिऊन जायचो, चटका बसू नये म्हणून ग्लासात ग्लास.लय भारी ना राव !

 

तिथेच शेजारी एक *साऊथ इंडियन हॉटेल* होतं किंवा आहेही म्हणा,(काही तरी *सागर* असं नाव होतं त्याचं) तिथं एकदा जेवायला गेलो.जेवतांना कांदा मागितला वेटरने आणून दिला आणि बिलात दहा रुपये लावले.

 

ह्याच पार्श्वभूमीवर एक अनुभव असाही आला, त्याच *बेंगलोर* आणि त्याच *मॅजेस्टिक एरिया* त एक पंजाबी हॊटेल आहे, तिथे जेवतांना भातावर घ्यायला डाळ कमी पडली म्हणून तसाच कोरडा भात खात होतो तर सरदारजी काउंटर वरुन विचारता झाला,

*”और दाल लो जी”* मी नको म्हणालो कशाला एक पूर्ण प्लेट घ्यावी लागेल आणि जेवण तर संपत आलं होतं माझं.

तिथं प्लेटच्या हिशेबाने कारभार चालायचा ना म्हणून.

तर तो तिथूनच म्हणाला,

*”ओय ! पैसा कौन मांगता है तेरे से?”* आणि वेटरला हुकूम देता झाला *”दाल परोस ओय बंदेको !”*

कुठे ते चार कांद्याच्या चार चकत्यांचे दहा रुपये घेणारे आणि कुठे हा सरदारजी?

*सागर बिगर नाव दिल्याने कुणाचं मन थोड* *सागरासारखं विशाल होतंय ?*

 

*मॅजेस्टिक थिएटर* पासून श्रीनिवास लॉजवर जातांना वाटेत संध्याकाळी अनेक स्टोल लागतात, *तळलेले भजे* मिळण्याचं ठिकाण, भजी अनेक प्रकारची किंमत मात्र प्रत्येकी एक रुपया.

जाता जाता पाच दहा रुपयाची घ्यायची.

कशाला, काय ?

संध्याकाळी लागतात कशाला?

सांगायला हवे ?

 

*चिकपेट* मध्ये *पावभाजी* मिळते पण अजब, ब्रेडच्या स्लाइसचा काठ काढून मधला मऊ भाग भाजीत क्रश करायचा आणि मग तो चांगला तव्यावरच रगडायचा झाली पावभाजी तयार.

आणि ते गरगट चमच्याने खायचे अन *पावभाजी* खाल्ली म्हणायचे.

डोक्याला हात लावला ना ?

माझंही तसंच काहीसं झालं होतं.

 

तीच गोष्ट *वडापाव* ची.

फक्त एका ठिकाणी तो मिळायचा.*एम जी रोडवर*.एका मोठ्या मॉलच्या एन्ट्री गेटवर, छोटंसं आऊटलेट होतं.पण संध्याकाळी दोन ते पाच. साडेपाचला बंद.कदाचित त्यांच्या डोसा, उत्तप्पावर संक्रांत येईल अशी भिती वाटत असावी.

*आपल्या वडापावची दहशत आहेच तशी!*

 

*चिकपेट* मध्ये एक *राजस्थानी हॉटेल* आहे.वरच्या मजल्यावर, तिथे उपवासाच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडायला जायचे,कारण तिथं *चारीठाव स्वैपाक* असतो दररोज, घरच्या सारखा.

 

*मुंबईतून मराठी माणूस आणि बंगलोर मधून कानडी माणूस केव्हाच हद्दपार झालाय*.

उगाचच दक्षिणेकडील भाषा बोलतो तो कानडीच असतो असे नाही.

 

नोकऱ्यांमध्ये सुद्धा *केरळी, तामिळी,उडिया* लोकांचा भरणा अधिक.ते अनुभवायचे तर दिवेलागणीला सर्व *साधारण बार* मध्ये जायचे, शेजारी बसणारा एकटा असेल तर संवाद साधायचा तेंव्हा तो हा फरक समजावून सांगतो.

 

हे बार प्रकरण पण लई भारी बरे !

लिकर शॉपच्या आंत एक रुम त्यात भिंती लगत छोटीसी फळी, त्या रुममध्ये जाण्याआधी काउंटर वरुन *स्टफ* घ्यायचा आणि तिथेच कापून ठेवलेल्या वर्तमानपत्राच्या कागदावर ते *पिवळे कुरमुरे* नि *ग्लास* स्वहस्ते घेऊन उभ्यानेच त्या फळीलगत आस्वाद घ्यायचा.बरे हे कुरमुरे, ग्लास, पाणी फ्री हं !

नो टीप बीप.

 

त्या तिथे एम जी रोडवरील *उच्चभ्रू बार* मध्ये *ड्रॉट बियर* नावाचा एक प्रकार मिळतो.

*ड्रॉट* म्हणजे काय तर *आख्खा बुधला* संपवला तरी ज्यामुळे ना पायांना ना जिभेला अडखळायला होतं असा *किक चा दुष्काळ* असलेला बियर प्रकार.

ती केवळ

*आम्ही तिथं ड्रॉट बियर प्यायलोय* अशी शेखी मिरवण्यासाठी प्यायची ती बियर.

जसं *गोव्या* ला गेल्यावर थू थू करत *फेणी* प्यायची ना तस्सस.

*(टीप:त्यापेक्षा तिथं कॉफी पावडर फेणीत मिसळून एक पेय मिळते ते प्या एक नंबर.)*

गोव्याची गोष्टच अल्लग.तिथं *PAL* नावाची बीयर मिळायची अकरा रुपयांत, पहिली रिकामी बाटली परत केली तर दुसरी भरलेली मिळायची दहा रुपयांत.सन १९७८ बरे !

ह्या एम जी रोडवर दुपारी साडेपाच वाजेपर्यंत निम्म्याहून कमी किमतीत दारु मिळते बारमध्ये, त्याच बारमध्ये साडेपाच वाजेनंतरचे दर तीनचार पट अधिक.

 

एका अशाच *सर्व साधारण बार* मध्ये चकना म्हणून *गरमा गरम रस्स* म छोट्याश्या ग्लासात.देतात,अगदी फ्री पण लिमिटेड.

काय मजा येते म्हणून सांगू?

एकदा ट्राय करा लेको !

 

*गब्बन पार्क:*

हे एक स्वतंत्र प्रकरण आहे बघा!

फार मोठ्या आकाराचे, अगदी *विश्वेश्वरय्या म्युझियम* पर्यन्त पसरलेलं, पुढे *कस्तुरबा रोड* त्यापुढे तोच तो प्रसिद्ध *एम जी रोड*

 

ह्या पार्कमध्ये संध्याकाळी सुंदर सुंदर ललनांचा वावर.दुरुन त्या पाहून भलभलते विचार यायचे.

एकदा त्या पार्कात फिरायला गेलो,त्या ज्या काही सुन्दर सुंदर दिसत होत्या ना त्यांचे इतरांबरोबरचे संवाद ऐकले डोक्यावर हात मारुन घेतला.त्या *ललना* नव्हत्या ते *लाले* होते.

तेंव्हा पासून आम्ही त्या पार्कला *छगन पार्क* म्हणायला लागलो.

म्हणजे काय तर:

*दूर से देखा तो हूर खड़ी थी*,

*पास जाकर देखा तो…*

*वो कोई और ही थी*

 

*मॅजेस्टिक, चिकपेट* ह्या भागांत सुळसुळाट आहे ह्यांचा.एक चित्रपट इथं लागला होता *फायर* का काही तरी नावाचा तेंव्हा जिकडे तिकडे हीच लोकं ना राव!

 

—-राजा जोशी

 

〰️🌱〰️🌱〰️🌱〰️

प्रतिक्रिया व्यक्त करा