You are currently viewing मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस यांचे निधन

मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस यांचे निधन

मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस यांचे निधन

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान मृत्यू; शुक्रवारी मोर्ले येथे अंत्यसंस्कार

दोडामार्ग :

मोर्ले गावचे माजी सरपंच तथा शिवसेना (शिंदे गट) तालुका संघटक गोपाळ सुरेश गवस (५२) यांचे गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.
गोपाळ गवस यांच्या निधनाची वार्ता समजताच सिंधुदुर्ग जिल्ह्यासह दोडामार्ग तालुक्यात शोककळा पसरली. त्यांच्या अकाली निधनाने मोर्ले परिसराने एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारा सहकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली होती.
गवस यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय सहकारी आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
शिवसेना दोडामार्ग तालुकाध्यक्ष गणेश प्रसाद गवस यांनी गोपाळ गवस यांना श्रद्धांजली वाहताना, “गोपाळ, तुझ्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तुझ्यासारखा सहकारी पुन्हा मिळणे नाही. सदैव लोकांसाठी झटणारा सोबती आज गेला. तुझी आठवण सदैव मनात राहील. तुझ्या बाबतीत असे लिहिण्याची वेळ आमच्यावर येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
गोपाळ गवस यांच्यावर शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मोर्ले, ता. दोडामार्ग येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा