You are currently viewing लेकितील आईसाठी

लेकितील आईसाठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी भोसेकर लिखित आरोग्यदायी लेख*

 

*लेकितील आईसाठी*

 

(भाग तिसरा).

 

आमच्याकडे *बाळंतिणीच्या आहारात बाजरीचा समावेश केला जातो.*

आता आपण बाजरीचे काही पदार्थ कसे करायचे ते बघूया .

 

१ )बाजरीच्या पिठात थोडं मीठ घालून भाकरी करावी .गरम भाकरीचा पापुद्रा (वरचा पातळ भाग ) काढून त्यावर साजूक तूप घालून भाजीबरोबर किंवा चटणी बरोबर खायला द्यावी

२ )सकाळी केलेली भाकरी दुपारी कुस्करून त्यात दूध घालून खायला द्यावी.

(आवडत असल्यास त्यात थोडी साय घातली तर अजून छान लागतं.)

३) सकाळी केलेली भाकरी कुस्करून त्यात गुळ व तूप घालून छोटासा लाडू बांधावा व खायला द्यावा .

४)कधीतरी भाकरी कुस्करून त्यात गूळ तूप ,मीठ,थोडं तिखट ,चिमूटभर गरममसाला व कोथिंबीर घालून एकत्र करून द्यावे .

५)कधीतरी फोडणीची पोळी व त्याप्रमाणे फोडणीची भाकरी द्यावी .

हे झाले भाकरीचे प्रकार .

६) बाजरी बरोबर ,ज्वारी ,नाचणी ,तांदूळ अशा मिक्स पिठात तिखट ,मीठ ,कोथिंबीर धणेजीरेपूड, लसूण, कांदा घालून भाकरी करावी. किंवा थालिपीठ करावे. यात गाजर, कोबी व इतर भाज्या, मोड आलेली कडधान्ये वाफवून घातली तर पोषण मूल्य वाढते.

 

कधी थोडी भूक असेल किंवा हलकसं काही हवं असेल तर

पेज ,कांजी ,सूप ,अळण घ्यावे.

 

आता आपण त्याचे प्रकार पाहू .

१ )तांदळाची पेज

तांदूळ शिजवताना भरपूर पाणी घालून शिजवायचे .ते शिजल्यावर वरचे पाणी काढून त्यात मीठ, मिरेपूड ,जीरेपूड आल्याचा रस २ ते ३ थेंब ,साखर व तूप घालून गरम गरम प्यावे .

टीप : पाण्यात १ छोटा चमचा तांदूळपीठी कालवून जास्त पाणी घालून चांगलं शिजवलं तर पेज लवकर तयार होईल .

 

२) तांदळाची पेज/ कांजी.

 

साहित्य : तांदळाची पिठी, तेल/ तूप, मोहरी, जीरं, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरची, आलं, लसूण, मेथीदाणे, तिखट, कोथिंबीर, मीठ, साखर, ताक, खवलेलं नारळ.

कृती : कढईत तांदळाची पिठी घालून हलकिशी भाजून एका भांड्यात काढून घ्यावी. थंड झाल्यावर त्यात पाणी घालून कालवून घ्यावी. कढईत तेल/ तूप घालून त्यात मोहरी, जीरं घालावं. नंतर त्यात ७ ते ८ मेथीदाणे घालावे. मेथीदाणे लालसर झाल्यावर त्यात आल्याचे तुकडे, लसूण, मिरची, कढिपत्ता घालावा. हिंग, हळद घालावी. हवं असल्यास थोडं तिखट घालावं त्यात पाण्यात कालवलेली तांदूळ पिठी घालावी. त्यात चवीप्रमाणे मीठ , साखर व ताक घालावे. (जेवढं पातळ हवं तेवढं ताक व पाणी घालावं.) एक उकळी काढावी. त्यात कोथिंबीर व खवलेलं नारळ घालावं.

 

नाचणीची पेज

साहित्य : नाचणीचं पीठ

तांदळाच्या पेजेप्रमाणेच

किंवा

वरील माहिती प्रमाणे आपण जी उकड करतो ती जास्त पाणी घालून पातळ कांजीप्रमाणे करावी .

३) बाजरीचा घाटा

साहित्य :बाजरीचे पीठ ,

तूप

गूळ

चिमूटभर मीठ

कृती : बाजरीचे पीठ कोरडेच भाजावे .भाजल्याचा मस्त वास आल्यावर त्यात तूप ,पाणी घालून शिजवावे .नंतर गूळ व मीठाची कणी घालावी .हे जरा पातळ करावे गरम असतांनाच वरून तूप घालून खावे .

टीप:बाळंतिणीने गूळ व तूप खूप खावे .दूध पण प्यावे .

गोड आवडत नसल्यास

बाजरीचं भाजलेलं पीठ पाण्यात कालवावे .तेल किंवा तूपाची व जीरं घालून फोडणी करून त्यात हे पीठ घालून शिजवावे .

नाश्त्यासाठी कधी पोहे ,कधी उपमा घ्यावा .

मोड आलेल्या मुगाची उसळ ,मुगाचा डोसा खावा .

* दूध – दिवसातून २ ते ३ वेळा दूध घ्यावे.

 

रात्री हळदीचे दूध घ्यावं.

 

हळदीचे दूध.

 

साहित्य : १ कप दूध

१चमचा खारीकपूड

१चमचा साखर

१चमचा बदामाचीपूड

१/२ (अर्धा) चमचा हळद

चिमूटभऱ वेलचीपूड

चिमूटभर सुंठपूड

कृती: पावकप पाण्यात साखर , हळद , सुंठ वेलची खारीक व बदाम घालून उकळावे. नंतर त्यात दूध घालून एक उकळी काढावी. गरम असताना प्यायला द्यावे .

टीप: सुंठ : पाचक .

खारीक : हाडांच्या बळकटीसाठी

हळद : रोगप्रतिकारक

साखर : मधुर

बदाम : बलवर्धक

वेलची : स्वादासाठी व पचनास

सहाय्यक.

बाळंतिणीला कोणती भाजी खायला द्यावी असा प्रश्न आपल्याला पडतो .डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या भाज्या द्याव्या. फक्त त्या वातूळ नसाव्यात. भाजी जास्त तिखट व तेलकट, जळजळीत असू नये.

दुधी ,पडवळ ,तोंडली ,भेंडी ,लालभोपळा ,शेंगभाज्या त्याचप्रमाणे मेथी ,शेपू इ पालेभाज्या .

मोड आलेले मूग ,कधी मटकी याची उसळ द्यावी .

 

बाळंतिणीच्या आहारात आमटी जास्त प्रमाणात असावी .शक्यतो तुरीची किंवा मुगाची आमटी असावी .

कुळथाचं कढण ,आमसूल व लसूण घालून केलेलं कुळथाचं पिठलं .

 

गोडसर ताज्या ताकाची कढी .(पाचवीच्या पूजेला साधं वरण ,भात , मेथीची भाजी ,कढी व पोळी करून नंतर बाळंतिणीला देतात )

ताजं गोडसर ताक मीठ ,जीरंपूड ,सुंठ,मीरेपूड हिंग ओवा घालून देतात .ताक दुपारच्या जेवणात द्यावे .रात्री देऊ नये .

पानात डाव्याबाजूस तोंडीलावणं म्हणून मोरआवळा , उपवासाचे लिंबू लोणचे,ओल्या हळदीचं लोणचं चालेल .लोणचं जितकं जुनं असेल तितकं चांगलं .

 

चटण्याचे काही प्रकार

 

१) नारळ ,कोथिंबीर ,पुदिना, आलं ,जीरं ,मीठ व लसूण घालून केलेली चटणी .(अालं व लसणाने थोडासा तिखटपणा येतो .)मिरची शक्यतो घालू नये. मिरची घालायची असल्याय मिरचीला उभी चीर देऊन त्यातील सगळ्या बिया काढून टाकाव्या मग ती वापरावी.

 

कधी नारळा ऐवजी रूचीपालट म्हणून शेंगदाणे, तीळ बाकी साहित्य कोथिंबीर, आलं इ. इ. वापरून चटणी करावी.

 

२)कारळे (खुरासणी ) ,लसूण ,जीरं मीठ थोडसं लाल तिखट .

 

३)जवस ,सुकं खोबरं ,जीरं ,मीठ व तिखट (हवा असल्यास लसूण )

 

४) तीळ ,जीरं ,मीठ ,तिखट .

 

५) खोबरं ,जीरं ,मीठ व तिखट

 

६) शेंगदाणे ,जीरं ,मीठ व तिखट

 

७) कढीपत्ता (तळलेला) तीळ ,जीरं, मीठ व

तिखट.

८) कारळे ,जवस,तीळ,खोबरं,शेंगदाणे तिखट

व मीठ .सगळे एकत्र करून.

 

चटणी नं १ ओली चटणी

चटणी नं. २ ते ८ कोरड्या चटण्या आहेत यात

कारळे ,जवस ,तीळ ,खोबरं ,शेंगदाणे भाजून घ्यावे .या चटण्या टिकतात आधी करून ठेवल्या तरी चालतात .

कारळे ,जवस ,याची चटणी करताना त्यात तीळ, खोबरं ,किंवा शेंगदाणे घातले तर छान लागतात .या चटण्या करताना सैंधव ,काळंमीठ

व थोडं साध मीठ वापरावं. चव छान लागते व

ते मीठ औषधी असतं.

 

तांबडा भोपळा, दूधी, दोडकी या भाज्याच्या सालीची चटणी छान होते. या चटणीतून शरीरास तंतूमय घटकांचा ( Fibers ) पुरवठा होतो.

 

दोडका, दूधी , भोपळा याची साली किसून तेलावर ( तिळाचं तेल )परताव्या , तीळ भाजून घ्यावे. चवीप्रमाणे मीठ व थोडसं तिखट घालून कालवावं. चटणी तयार.

 

बाळंतिणीने पाणी भरपूर प्यावे .शक्यतो गरम पाणी प्यावे .

 

रोज २ ते ३ खारका व खोबऱ्याचा तुकडा चावून चावून तोंडात घोळवून खावा .खारकेचे तुकडे न करता दातांनी फोडून बी काढावी. दात व हिरड्यांना खोबऱ्यातील तेल व खारकेमुळे एक प्रकारचा मसाज होतो .

 

बाळाला दूध पाजण्यापूर्वी १ग्लास पाणी प्यावे .

दूध पाजून झाल्यावर काहीतरी खावे .(हे डॉक्टरांनी सांगितले आहे .)

राजगीरा चिक्की ,शेंगदाणा चिक्की किंवा आळिवाचा लाडू .गुळपापडीची वडी, आल्याची वडी इ इ .

 

 

कृपया ,

“मी माझ्या माहितीनुसार, जेष्ठांच्या सल्ल्याने आणि निरीक्षणाने लेखन केले आहे .काही कमी अधिक झालं असल्यास मोठ्या मनाने माफ करावे .”

आपली _

सौ. मानसी शरश्चंद्र भोसेकर …

प्रतिक्रिया व्यक्त करा