You are currently viewing माझी खाद्य संस्कृती

माझी खाद्य संस्कृती

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*माझी खाद्य संस्कृती* (भाग-०३)

 

 

माझी खाद्य संस्कृतीचा असाही एक मोठा भाग आहे जिथे *अपेयपान* आणि *अभक्ष्य भक्षण* निषिद्ध नाहीए, मुद्दाम सुरुवातीसच सांगतो, नाही तर *शिव शिव शिव* म्हणत बसाल,

तर असो,

पाककला हा विषय गहन आहे, त्यातही *उमेश मोकाशीची पाककला* एक गहनातीत गहन विषय.

एकदा त्याने रस्स्याचे पापलेट बनवले होते कोणतेही वाटण न लावता.

पापलेट लालसर रस्स्यात तरंगत होते.

हो! सांगू नका हं कुणाला!

पापलेट अस्सं बनवतात म्हणून!

अस्सल सारस्वत मासे खाणे सोडून देईल.

एकदा त्याने तयार *भाजीत* म्हणजे *मटनात* बटाट्याच्या फोडी करून गॅसवर तीन शिट्ट्या घ्यायला लावल्या होत्या, उद्देश:बटाटे शिजून रस्स्यात उतरतील आणि रस्सा घट्ट होईल.उद्देश चांगला होता पण झाले भलतेच भाजीत हाडं विरघळली पण बटाट्याच्या फोडींनी विघटनाला नकार दिला.

एवढे सगळं होऊनही हा पठ्ठ्या असं काही बोलून गार करायचा की अस्सल शेफलाही वाटावं हीच खरी रेसिपी,

अर्थातच नुसतं जेवण नसायचं, असायचं ते सर्व साग्रसंगीत.

अन मग *सुरपानाला सुरुवात*.

थांबा त्याअगोदर *उदबत्ती* लावली जायची म्हणजे वरच्या मजल्यावर वास नको ना जायला !

माहोल बन जाता था!

जोडीला *खान* असेल तर क्या कहेने

ह्या खानला आकाशी चंद्र दिसला की प्यायचा मूड यायचा, मग सेकंड शिफ्टला भलेही हाफ डे घेणे का होईना!

उम्याच्या घरी लाईट्स ऑफ करून उदबत्ती पेटवून चौरंगाभोवती जमिनीवर खालीच अनेक वेळा आम्ही सुरापानाला बसलोय, फक्त बाईजी त्या रात्री त्यांच्या मुलीकडे मुक्कामी गेलेल्या असाव्यात.

चौरंगाचा असाही उपयोग होतो तर .

अगदी तश्शीच बैठक सी. टी. एस. ग्राउंड रन च्या स्लॉटवर *मी ,उम्या ,खान आणि तारवाला इंद्रिस* बसायचो

चौरंगाच्या ऐवजी तो स्टँड होता ना !

प्रेशर गेज टॅपिंगच्या पाईपांचा

 

*उम्या* चा विषय निघाला की *हॉटेल लिबर्टी* विसरून कसं चालेल ?

*प्रभात टॉकीज* च्या समोरच होतं ते.

होतं म्हणावं लागेल

तेही इतिहासात हरवलंय कुठे तरी !

त्याला तीन मजले होते आणि त्यावरचाही एक मजला होता अडगळीचा

त्या मजल्यावर तासनतास बसायची आम्हाला *लिबर्टी* म्हणून च त्याचं नाव लिबर्टी असावं.

*नासिक* मधील प्रथितयश *लिकर वेंडर* सुद्धा तिथं यायचे कारण एकच *लिबर्टी*

*प्रायव्हसी ची लिबर्टी*

मालक तळमजल्यावर.

पैसे घ्यायचे द्यायचे तळमजल्यावर,

मग काय?

प्रत्येक मजल्यागणिक बिल *झिरपत झिरपत* जायचे

*उमेश* हा एकमेवाद्वितीय असे म्हणे पर्यंत माझ्या आयुष्यात *चौरे* आला.*ओमप्रकाश चौरे किंवा ओ.जी.चौरे*.म्हणा हवे तर.

देवाने एक सारखी दिसणारी सात माणसे निर्मिलेली असतात असं काहीसं कुठे तरी वाचलं होतं, पण एक सारख्या वृत्तीची किंवा प्रवृत्तीची दोन मात्र नक्कीच घडवली असतील, विश्वास आहे मला.

हो आहेच विश्वास.

कशातही काहीही घालून फोडणी द्यायची आणि चव म्हणाल तर यंव रे यंव !

हे कसब *चौरे* चेच.

एकदा तर याने *मॅगी* बनवली आणि ती शिजवली त्या पाण्याचेही *सूप* बनवले.

बोला आता !

खरं तर *चौरे* वर स्वतंत्र एपिसोड लिहावा लागेल.

खातांना काहीही काढून टाकायचे नाही हे त्यानेच मला शिकवले.नाही तर मी कडीपत्ता, आमसूल काढून टाकत होतो.आमचे *कामे उस्ताद* तर कोथिंबीरही काढून टाकायचे.

चौरेला अगदी हिरवी मिरची काढून टाकलेली चालत नसे.मी गुपचूप त्याची नजर चुकवून काढून टाकायचो.

पिण्याचेही *शास्त्र* असते,त्याचे मंत्र *राजेंद्र मास्तरने* शिकवले.

म्हणजे बघा त्याकाळी *डबल हॉर्स,फ्लाईंग हॉर्स,ब्लॅक हॉर्स* असे रमचे ब्रँड *कँटीन* ला मिळायचे(अस म्हणतात ती घोड्यांना पाजायची दारू होती ती ते माणसांना पाजायचे) नाना क्लुप्त्या करून आम्ही ती आम्हाला पिण्यायोग्य बनवायचो

*राजेंद्र मास्टर* ने एक क्लुप्ती सांगितली एकदम फिट ना बॉस !

ग्लासच्या तळाशी लिंबाची एक चकती ठेवायची नि नंतर पेग भरायचा नंतर त्यावर पाणी.

करून बघा एकदा !

हो! पण ती तसली रम आता कॅन्टीनमध्ये ही मिळत नाही !

आता कँटीन मध्येही *ओल्ड मंक आणि मॅक डोनाल्ड* मिळते.

*कँटीन* चीच का ? तर,

फक्त तिथेच अकरा रुपयाला अख्खा खंबा मिळायचा म्हणून.

होळीच्या दरम्यान *आय ओ सी* च्या *अग्रवाल साहेबा* ने आणलेल्या स्टॉक मधून एक खंबा मी काढून घेतला होता,आठवते.

म्हणजे त्याने इलेव्हन बीआरडी कँटीन मधून स्कुटरच्या डिक्कीत तो स्टॉक आणून ठेवला होता आणि काही कामानिमित्त हँगरच्या बाहेर स्कुटर पार्क करून तो हँगरमध्ये गेला होता.

ती डिक्की कशी उघडायची मला ठाऊक होते.

केवळ अकरा रुपये किंमत असल्याने त्यालाही काही वाटले नाही फक्त *”होली मुबारक!”* म्हटल्याचे आठवते.

अशी ही खाद्य संस्कृती, ती केवळ आणि केवळ माझीच आहे.

 

–राजा जोशी

9823687519

👨‍❤️‍👨 👨‍❤️‍👨 👨‍❤️‍👨 👨‍❤️‍👨

प्रतिक्रिया व्यक्त करा