दुष्काळी परिस्थिती पाहणीसाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा संभाजीनगर व जालना दौरा
तलावातील पाणीसाठा ३४ टक्क्यांवर; पंचनामे करून पात्र मच्छीमारांना मदत देण्याची कार्यवाही
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवणाटाकळी तलावाची पाहणी करून मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांशी संवाद साधला. यावेळी मच्छीमारांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेत त्यांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचा विश्वास त्यांनी दिला.
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘दुष्काळ Trigger-1’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित तलाव, जलाशय व इतर ठिकाणी पंचनामे करण्याच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली. कमी पर्जन्यमानाचा परिणाम शिवणाटाकळी तलावातील पाणीसाठ्यावर झाला असून, तलावातील पाण्याची पातळी सुमारे ३४ टक्क्यांपर्यंत घटली आहे. त्यामुळे मत्स्य उत्पादनावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले.
पाण्याची घटलेली पातळी आणि त्याचा मत्स्य व्यवसायावर झालेला परिणाम याबाबत आवश्यक मोजमाप करून पंचनामे करण्यात येतील. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार पात्र मच्छीमारांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा मच्छीमार बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असेही सांगण्यात आले.
महिला मच्छीमार बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार
या भागातील महिला मच्छीमार बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या मत्स्यजन्य उपपदार्थांना (Fish By-products) योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. महिला बचत गटांना उत्पादनाबरोबरच त्याच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या
पाहणीदरम्यान स्थानिक मच्छीमार बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी, मत्स्य उत्पादनातील घट, तलावातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती तसेच शासनाकडून अपेक्षित मदतीबाबत माहिती घेण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यावेळी स्थानिक आमदार संजना जाधव, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, सह आयुक्त (भूजल) ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरिमा जाधव तसेच मत्स्यव्यवसाय विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
