संपादकीय
*घराघरात संपर्क साधणारा एकमेव युवा नेता*
कोकणातील घराघरात मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा आणि कोकणची ओळख कायम राखणारा सण म्हणजे गणेशोत्सव..! कोकणात साजरा होणाऱ्या आणि कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याच्या गणेशोत्सव सणासाठी देश विदेशात असलेले चाकरमानी आपल्या घरांकडे धाव घेतात आणि चतुर्थी सणातील आरती, भजन आदींमध्ये उत्साहाने सामील होतात. कितीही संकटे येवोत की आपत्ती असू दे, कोकणी माणूस उत्साहाने गणरायाची सेवा करतो आणि गणरायाकडे फक्त सुख समाधान मागतो. अशावेळी केवळ निवडणूक जवळ आल्या की, अनेक राजकीय नेत्यांना मतदारांची घरे दिसतात, तेल गुळ, साखर अगरबत्ती आदी वाटप करून लक्ष वेधून घेतात. यावेळी मात्र गणेशोत्सव काळात अनेकांना मतदारांचा विसर पडला असताना भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आपली पत्नी सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांच्या सोबत मतदारसंघातील अनेक घरांमध्ये भेटी देत तब्बल १४७३ गणपतींचे दर्शन घेत आपण फक्त कामापुरता फिरत नसून लोकांच्या अडीअडचणीत, सुखदुःखात त्यांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले.
*चिंतातुर बळीराजासाठी श्रीगणेशाकडे साकडे*
कोकणासह महाराष्ट्रात यावर्षी पर्जन्यराजाने दडी मारल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले, भविष्यात जनावरांसाठी चारापाणी, वैरणीचा प्रश्न गंभीर बनला असून बळीराजा चिंतातुर झाला आहे. अशावेळी बळीराजाला धीराचे शब्द देणारा, शेतीच्या नुकसानीबाबत शासकीय पातळीवर आवाज उठवणारा आपला माणूस हवा असतो. विशाल परब यांनी घरोघरी जात बळीराजावर आलेले विघ्न दूर करून जिल्हा सुजलाम, सुफलाम करून महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढावे असे साकडे घातले. यावेळी त्यांनी मुंबई पुण्यातून गावी आलेल्या चाकरमानी तरुण तरुणी, युवाई, ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक आदींशी संवाद साधून मतदारसंघातील समस्या जाणून घेतल्या असता अनेकांकडून मतदारसंघात अपेक्षित असलेल्या विकासाबाबत चर्चा घडून आली. मतदारसंघात फिरत असताना जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न हाच सर्वात मोठी समस्या असल्याचे दिसून आले. नोकरीसाठी सिंधुदुर्गातून दररोज शेकडो तरुण दुचाकीने गोवा येथे जा ये करतात हे त्यांच्या दृष्टीने धोकादायक असून जिल्ह्यातच रोजगार निर्माण झाल्यास तरुण तरुणींना मुंबई, पुणे गोवा आदी ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागणार नाही आणि ओस पडत आलेले जिल्ह्यातील गाव राखले जातील अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली असून जिल्ह्यातील रोजगार, आरोग्य, शिक्षण, स्थानिक उद्योग व्यवसाय यांना चालना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी जनतेतून व्यक्त झाली.
*शासन आणि शेतकरी जनतेतील दुवा बनणारे युवा नेतृत्व*
जनतेचे प्रश्न ऐकून घेत जिल्ह्यात आवश्यक असलेल्या सुविधा भविष्यात निर्माण करण्यासाठी जनतेचे प्रश्न मुख्यमंत्री, खासदार, प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून लवकरच त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील असे त्यांनी आश्वासन दिले. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर रोजगार, छोटे मोठे व्यवसाय उभारण्याचे प्रयत्न सुरू असून सुरू असलेल्या छोट्या, लघु उद्योगांना चालना देण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. पावसा अभावी सुकत चाललेली भातशेती पाहता जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करून कृषी व पशुसंवर्धनाच्या माध्यमातून शासनाकडून मदत मिळावी अशा मागणी केल्या. परब यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत सर्व मागण्या शासनापर्यंत पोचवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. जनतेला त्यांच्या मागण्या शासनस्तरावर पोचविण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मध्यस्थाची गरज असते. विशाल परब यांच्या माध्यमातून शासन आणि जनतेतील दुवा अशी परब यांची प्रतिमा निर्माण झाली असून मतदारसंघातील जनतेला कुणीतरी वाली उरला आहे अशी भावना वाढीस लागली आहे.
सावंतवाडी मतदारसंघातील तिन्ही तालुके गोवा राज्याला लागून असल्याने गोव्याप्रमाणे इथेही पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधला जाऊ शकतो, त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व स्थानिक लघु उद्योग यांच्या माध्यमातून गावनिहाय विकास आराखडा तयार करून गाव विकास साधण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जाणार असल्याचे सांगून त्यांनी गावागावातील रस्ते, वीज, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य या प्रश्नांवर नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची त्यांनी ग्वाही दिली. राजकारण हे निवडणुकीपुरते असते त्यानंतर मात्र मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे तरच विकास साधला जाईल. त्यामुळे राजकारण करत असताना केवळ हार जीत यावर आपण भविष्याची वाटचाल ठरवत नसून ती केवळ एक प्रक्रिया आहे, विजय असो की पराजय जनतेच्या सोबत सदैव राहणारा कार्यकर्ता अशी त्यांनी आपली प्रतिमा असल्याचे दाखवून दिले.
*स्वतःचा उत्सव विसरून जनतेसाठी काम करणाऱ्या हातांचे तोंड भरून कौतुक*
गणेशोत्सव हा काही दिवसांचा असला तरी तो यशस्वी करण्यासाठी अनेक हात कित्येक दिवस आपला उत्सव विसरून राबत असतात अशा अदृश्य हातांना प्रोत्साहन देताना त्यांनी पोलिस, होमगार्ड, वीज वितरणचे कर्मचारी, एसटी कर्मचारी, रिक्षा, टेम्पो चालक, व्यावसायिक, दुकानदार, व्यापारी, फळे फुले विक्रेते, मूर्तिकार, रंगकाम करणारे आणि आरोग्याची व्यवस्था पाहणारे आरोग्य कर्मचारी अशा सर्वांचे तोंड भरून कौतुक केले आणि आभार मानले. यामुळे सर्वसामान्य जनतेची, काम करणाऱ्या हातांची जाण असणारे जनसेवक अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
*मतदारसंघातील भाजपाचा आश्वासक चेहरा*
सावंतवाडी मतदारसंघात भाजपाचे अनेक नेते कार्यरत आहेत परंतु अडीअडचण, कार्यक्रम, सण सोहळे, उद्घाटन, खेळ अशा प्रत्येकवेळी एकच नाव लोकांच्या मुखात येतं ते म्हणजे विशाल परब..! कारण, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून निर्माण झालेली त्यांची ओळख आणि खरोखरच प्रत्येकाच्या हाकेला त्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद..! कुठल्याही संघटनांची शिबिरे, आरोग्य शिबिरे, गावागावातील नाटक स्पर्धा, खेळ, क्रिकेट स्पर्धा असो की कुठलाही सार्वजनिक उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम अनेकजण विशाल परब यांच्याकडे आधारस्तंभ म्हणून आशेने पाहतात आणि ते सुद्धा त्यांचा आधार बनतात. केवळ आश्वासन देऊन थांबत नाहीत तर मदतीचा हात सदैव पुढे करतात. मतदारसंघातच नव्हे तर जिल्हाभरात देखील मोठा कार्यक्रम घ्यायचा असेल तर तो घेण्याची धमक भाजपामध्ये कोणात असेल तर ते म्हणजे विशाल परब. कारण, तसे मोठ्या कलाकारांचे हजारोंच्या उपस्थितीत मोठमोठे कार्यक्रम यशस्वीरित्या घेऊन त्यांनी त्याचा प्रत्यय आणून दिलेला आहे. सावंतवाडी भाजपाचा कुठलाही कार्यक्रम असो, तो राबविण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन ती पूर्णत्वास नेण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्याने सावंतवाडी भाजपा देखील बऱ्याचअंशी विशाल परब यांच्याच नेतृत्वात पुढे जात असल्याचे दिसून आले आहे.
निवडणूक, राजकारण दूर ठेऊन सामाजिक कामात झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून आज विशाल परब यांच्याकडे पाहिले जात आहे ते त्यांच्या अंगी असलेल्या विशेष गुणांमुळेच याचा प्रत्यय वारंवार त्यांच्या वागण्यातून आणि कामातून येत आहेच आणि भाजपाचे वरिष्ठ नेते तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मर्जीतील कार्यकर्ते असल्यामुळेच ते मतदारसंघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील भाजपचा आश्वासक चेहरा बनले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
