साहित्य लीला पंढरी / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बुद्धिबळाच्या पटावर आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखविणाऱ्या आदिती महानंदा निलेश कोरे हिने शैक्षणिक तसेच कला क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आदिती ही मॉडर्न एज्युकेशन स्कूल, विटा येथे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळवून आपल्या बुद्धिकौशल्याची छाप पाडली. त्यानंतर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावत तिने आपल्या यशाची दिमाखदार पुनरावृत्ती केली.
बुद्धिबळाबरोबरच आदितीने शैक्षणिक क्षेत्रातही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तिने जिल्ह्यात ३२ वा क्रमांक मिळविला. तसेच इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेत ‘A’ ग्रेड मिळवून चित्रकलेतील आपली प्रतिभाही सिद्ध केली आहे. NMMS परीक्षेतही ती सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे.
अभ्यास, बुद्धिबळ आणि चित्रकला या तिन्ही क्षेत्रांचा सुंदर समतोल साधत आदिती आपली वाटचाल करत आहे. विशेषतः चित्रकलेची तिला मनापासून आवड असून सर्जनशीलतेला ती आपल्या अभ्यासासोबत योग्य प्रकारे जोपासत आहे.
बुद्धिबळामुळे तिच्या विचारांना शिस्त, संयम, एकाग्रता आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळत असल्याचे तिच्या कामगिरीतून दिसून येते. शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा कौशल्य आणि कलागुण यांचा सुरेख संगम असलेली आदितीची ही यशस्वी वाटचाल इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
आदितीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्याकडून अभिनंदन होत असून, भविष्यातही ती अशाच प्रकारे उत्तुंग यश संपादन करेल, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
