निर्माल्यापासून खतनिर्मितीचा सावंतवाडीत अनोखा उपक्रम
मोती तलाव काठावर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांकडून निर्माल्य संकलन
सावंतवाडी : गणेश विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचा योग्य पद्धतीने वापर व्हावा, यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सावंतवाडीत दरवर्षीप्रमाणे यंदाही अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. गणेश विसर्जनासाठी मोती तलाव येथे येणाऱ्या भाविकांनी निर्माल्य पाण्यात न टाकता त्यासाठी ठेवलेल्या कलशात जमा करावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांकडून करण्यात आले.
मोती तलावाच्या काठावर निर्माल्य संकलनासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला होता. येथे प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी भाविकांकडून निर्माल्य जमा करून घेतले. संकलित केलेले निर्माल्य प्रतिष्ठानच्या केंद्रावर नेण्यात आले.
प्रतिष्ठानच्या केंद्रावर निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून संकलित निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करण्यात येणार आहे.
तयार होणारे खत प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांना वापरण्यात येणार आहे. त्यामुळे निर्माल्याची योग्य विल्हेवाट लागण्याबरोबरच त्याचा पर्यावरण संवर्धनासाठी उपयोग होणार आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवातील निर्माल्याचा पुनर्वापर करून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे.
