*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*भाद्रपदाचा देखणा सोहळा*
हिंदू कालगणने प्रमाणे श्रावणानंतर भाद्रपद येतो. तसा श्रावण सृष्टीला पानाफूलांनी सजवत, रिमझिम धारात भिजवत, हिरवाईने नटवत, फेसाळणारे जाई जुईच्या लांब लांब गजरे सोडावेत असे शुभ्र धबधबे खळखळात घेऊन येतो. मांगल्याच्या परंपरा, कृतज्ञता दाखवणारे नागपूजा, बैलपोळाव मातृपूजन असे सोहाळे होतात. विशेष पूजा ऊपासना असते. कहाण्या कथा, नंदादिप, सज्ज देवघर, गोड खमंग स्वादिष्ट दरवळ यांचा श्रावणात रंगतदार जल्लोष असतो.
असा गुणसंपन्न श्रावण जेव्हा माघारी जायला निघतो…
निरोप घेऊ लागतो तेव्हा मन उंच खट्टूच होते. पण पाठोपाठ
भाद्रपद चैतन्याने भारलेल्या ऊत्सवांना
घेऊनच हजर होतो.
तृतियेला देवी पार्वतीचे हरितालिका पूजन, ऊपवास, जागरण इ. सुवासिनी व मुली चांगला शंकरासारखा वर पार्वतीच्या आशीर्वादाने मिळावा म्हणून करतात.
दुस-या दिवशी तीच लगबग, तयारी, सज्ज देवघर तेवणा-या समया, नैवेद्य, आरती, सजवलेले मखर, रांगोळ्या तोरणे. हेच घरोघरी मोठ्या ऊत्साहात चालू असते. मोदकांचा सुवास दरवळतो, आरतीचा जल्लोष चालतो. नवे कपडे, अलंकार गजरे इ. हौसमौज बघायला मिळते.
असा थाटमाट घेऊन चतूर्थीला गणराज येतात.
आगमन मोठ्या दिमाखात, श्रद्धेने, वाजत गाजत व आनंदात होते. गणराय दीड, पांच, गौराईबरोबर किंवा दहादिवसांचे मानाचे पाहुणे असतात.
सप्तमीला मानाच्या माहेरवाशणीला आमंत्रण जाते व ही माहेरवाशिण गोराई हंसत वाजत गाजत येते. घरची मालकीण घरभर फिरवून घर तिजोरी, दुधदूभते स्वैंपाकघर चूल विहिर दाखवते. व मानाने चौरंगावर बसवते.
पुढ्यात छान रांगोळी, फळेफूले, लाडू चकल्या पेढे यांचे ताट, वीडा ठेवून आदरसत्कार केला जातो. औक्षण होते. अलंकार, फुलेपाने यांनी सजवली जाते.गौराईची गाणी खेळ होतात. भाजी भाकरीचे भोजन होते.
दुस-या दिवशी पुरण,तळण, वरण इ. महानैवेद्य होतो. ओटी भरली जाते.सवाष्णभोजन होते. दक्षिणा विडा वस्त्र अर्पण करतात.संध्याकाळी हळदकूंकू होते. वाण दिले जाते. सकाळ संध्याकाळ आरती प्रसाद असतो.
असा गौराईचा सन्मान राखला जातो.
गृहलक्ष्मीचा ऊत्साह पराकोटीला पोचतो.
तिस-या दिवशी गौराई निघतात.
जाताना खीर कानवला दहीभाताची शिदोरी देतात.
घरची मालकीण मुलंबाळं, सौभाग्य, घरदार यांच्या सुखासाठी पदर पसरून आशीर्वाद मागते.
निरोपाचा हळवा क्षण डोळे भरून आणतो.
गौराई व गणेशांची पाठवणी केली जाते. घरदार, अंगण, घरची माणसे यांची मने रिकामी होतात.
वर्षातून येणारा गौराईचा सोहळा संपतो. दहादिवसांनी गणेश ऊत्सव ही संपतो.
अनंत चतूर्दशीला अनंतापूजन होऊन मंगल सोहाळे संपतात.
आता पितृपंधरवडा चालू होतो व तिथीप्रमाणे देवाघरी गेलेल्या प्रिय आप्तजनांचे स्मरण, पूजन, भोजन चालू होते.
एकूणच भाद्रपदमहिना हा ऊत्सवांचाच मास आहे.
सर्व ऋतूंचे अनुभव एकट्या भाद्रपदात घेता येतात हे भाद्रपदाचे विशेष आहे.
आता पिके तयार होऊ लागतील, कापणीचा हंगाम येईल.
अनुराधा जोशी.
अंधेरी. मुं. 69820023605
