धाराशिव (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा आठ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात पुरेसा पाऊस न झाल्यास गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे यंत्रणांनी घाबरून न जाता लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पिण्याचे पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेचे आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे.दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहावे,असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज,१७ सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी पाणीटंचाई आणि पीक नुकसानीच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर व निवारा उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
टँकरचे नियोजन आतापासूनच करा
पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले, जिल्ह्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून दीर्घ खंडामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.आगामी काळात संभाव्य भीषण टंचाईला सामोरे जाण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आतापासूनच सज्ज राहावे. विशेषतः पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची आवश्यकता लक्षात घेऊन त्याचे नियोजन आतापासूनच करावे.राज्य शासनदेखील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. जिल्ह्यातील पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाने साथ दिली नसली तरी शासन शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही.पाणी,चारा आणि पीक नुकसानीच्या प्रश्नावर प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करून परिस्थितीला सामोरे जावे.लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी स्पष्ट केले.
आपत्कालीन वीज भारनियमन थांबवा
पीक नुकसानीच्या काळात ज्या पिकांना पाणी दिले जात आहे, अशा वेळी करण्यात येणारे आपत्कालीन वीज भारनियमन महावितरणने तात्काळ थांबवावे,असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याबाबत महावितरणच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. वीजविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच महावितरणचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल,असेही श्री. सरनाईक यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची गरज
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले आहे.काही ठिकाणी हे नुकसान जवळपास शंभर टक्क्यांपर्यंत आहे.शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.पिण्याच्या पाण्याची परिस्थितीदेखील गंभीर आहे.आजच अनेक भागांत पाणीटंचाई जाणवत आहे. भविष्यात टँकरची मागणी वाढल्यास टँकर भरण्यासाठी पाणी आणायचे कुठून,हाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे,याकडे खासदार श्री. राजेनिंबाळकर यांनी लक्ष वेधले.या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे.टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावेत,अशी मागणीही त्यांनी केली.या संभाव्य पाणी संकटाचे गांभीर्य शासन आणि प्रशासनाने लक्षात घ्यावे. भरीव निधीची तरतूद करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी.महावितरणनेही आपत्कालीन वीज भारनियमन करू नये,असे खासदार श्री. राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
पीक नुकसानीचे मूल्यांकन करताना उपग्रहाद्वारे दर्शविण्यात आलेले उत्पन्न गृहीत धरण्याची अट रद्द करावी.सर्व शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी झाली पाहिजे,जेणेकरून शंभर टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल,असेही खा. श्री.राजेनिंबाळकर म्हणाले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले,पीक कापणी प्रयोगाचे काम एका आठवड्यात पूर्ण करण्यात यावे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी आणि शासनाला आवश्यक असलेली माहिती विहित नमुन्यात त्वरित उपलब्ध करून द्यावी,असे त्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली.पीक कापणी प्रयोग सुरू झाले असून नियोजनबद्ध पद्धतीने पंचनाम्याचे काम करण्यात येत आहे.धाराशिव तालुक्यात पाच आणि लोहारा तालुक्यात एक टँकर सुरू आहे.१८४ विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.तालुकास्तरावर पाणीटंचाई आराखड्याबाबत बैठका घेण्यात आल्या असून जुलै २०२७ पर्यंतचा जिल्ह्याचा टंचाई आराखडा लवकरच तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी विभागाचे श्री.चोपडे यांनी जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्र, खरीप हंगामातील लागवड,झालेले पर्जन्यमान,पावसाचा दीर्घ खंड, तालुकानिहाय पावसातील खंड आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट तसेच पीक नुकसानीची सविस्तर माहिती दिली.
जलसंपदा विभागाचे श्री.थोरात यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या केवळ आठ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती दिली.उपलब्ध पाणीसाठ्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शेतीच्या सिंचनासाठी पाणी देणे बंद करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे श्री.मांजरमकर यांनी भूजल परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट झाली असून काही ठिकाणी ती सुमारे सात मीटरने खाली गेली आहे.या कालावधीत भूजल पातळी साधारण दोन ते तीन मीटरपर्यंत अपेक्षित होती,मात्र पावसाच्या दीर्घ खंडामुळे भूजल पातळी झपाट्याने घटल्याचे त्यांनी सांगितले.
पशुसंवर्धनचे डॉ.मुळे यांनी जिल्ह्यातील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याची उपलब्धता आणि संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली.
पाऊस लांबल्याने एकीकडे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत,तर दुसरीकडे गावागावांतील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरही ताण वाढत आहे.त्यामुळे पीक वाचविण्यापासून शेतकरी वाचविण्यापर्यंत आणि आजचे पाणी जपण्यापासून पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी व चाऱ्याची व्यवस्था करण्यापर्यंत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. सरनाईक यांनी बैठकीत दिल्या.
