You are currently viewing श्री. नागनाथ नरसिंगराव फटाले: एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व

श्री. नागनाथ नरसिंगराव फटाले: एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व

सांगली (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार)

श्री. नागनाथ नरसिंगराव फटाले यांचा जन्म 23 जून 1937 रोजी सोलापूर (मूळ गाव – मुधोळी, जि. गुलबर्गा, तत्कालीन निजाम संस्थान) येथे झाला.

श्री. नागनाथ नरसिंगराव फटाले हे मराठवाड्यातील विकास पत्रकारितेचे प्रणेते, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, संघटक आणि स्वातंत्र्य चळवळीतील सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विचाराने त्यांनी संपूर्ण आयुष्य कार्यरत राहून मराठवाड्याच्या विकासाला दिशा देणारी पत्रकारिता केली.

सोलापूर येथे त्यांचा जन्म झाला. अत्यंत सामान्य परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी आपल्या कुटुंबातील एस.एस.सी. व पदवीधर होणारे पहिले व्यक्तिमत्त्व होण्याचा मान मिळविला. इंटर कॉमर्स परीक्षेत पुणे विद्यापीठात अर्थशास्त्र विषयात सुवर्णपदक प्राप्त करून त्यांनी आपल्या गुणवत्तेची छाप उमटविली. पुढे मराठवाडा विद्यापीठातून बी.ए. पदवी संपादन केली.

कारकिर्दीच्या प्रारंभी त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक म्हणून कार्य केले. शिक्षक म्हणून मिळालेल्या अनुभवामुळे जटिल विषय अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्यांची शैली विकसित झाली. पुढे औरंगाबाद येथे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात मानद प्राध्यापक म्हणून वृत्तलेखन व विकास पत्रकारिता या विषयांचे अध्यापन केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी पत्रकारितेवरील दोन अभ्यासक्रमीय ग्रंथांचे लेखनही त्यांनी केले.

सन 1962 पासून त्यांनी पत्रकारितेची वाटचाल सुरू केली. ‘संचार’, ‘साप्ताहिक संघर्ष’, ‘मराठवाडा’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘दैनिक सकाळ’ या प्रतिष्ठित वृत्तपत्रांमध्ये त्यांनी विविध जबाबदार्‍या सांभाळल्या. 1987 पासून ते दैनिक सकाळचे पूर्णवेळ प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहिले आणि जून 2004 पर्यंत त्यांनी अखंड पत्रकारिता केली.

त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य म्हणजे विकास पत्रकारिता. दुष्काळ, शेती, सिंचन, पर्यावरण, ग्रामीण विकास, रोजगार हमी योजना, बियाणे उत्पादन, कृषी संशोधन, सामाजिक प्रश्न, शिक्षण, संस्कृती, ग्राहक चळवळ, कामगारांचे प्रश्न आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विषय त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले. त्यांच्या लेखनामुळे अनेक विकासप्रश्न शासनाच्या दृष्टीस आले आणि धोरणात्मक बदलांना चालना मिळाली.

1967 मध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी झालेल्या ‘भूज पाकिस्तानला देऊ नये’ या सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. सत्य, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये राहिली.

सामाजिक क्षेत्रात त्यांनी ग्राहक चळवळ उभारण्यात अग्रणी भूमिका बजावली. मराठवाड्यातील पहिली ग्राहक चळवळ सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच राज्यस्तरीय एस.टी. हमाल संघटना, कापड गिरणी कामगार संघटना आणि असंघटित कामगारांच्या विविध संघटनांचे नेतृत्व करून त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला. छ.संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील केंद्र-राज्य सरकारी नोकर, खाजगी संस्थाचे नोकर, शिक्षक, व्यापारी दुकानातील नोकर यांची संघटना बांधून सर्वांच्या समान मागणीसाठी पुढाकार घेतला. विलाराव देशमुख मुख्यमंत्री आणि अशोकराव चव्हाण सांस्कृतिक मंत्री असताना महाराष्ट्र शासनाने पद्मश्रीसाठी त्यांचे नामांकन केंद्र सरकारकडे पाठविले.

पत्रकारितेबरोबरच त्यांनी ग्रंथालय चळवळ, ज्योतिष व परामानसशास्त्र अभ्यास, सामाजिक संघटनांचे नेतृत्व, पत्रकार संघटनांमधील जबाबदार्‍या आणि विविध सार्वजनिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघटना, औरंगाबाद जिल्हा पत्रकार संघ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद तसेच मराठवाडा जनता विकास परिषद या संस्थांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण सक्रिय सहभाग नोंदविला.

भावसार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक विकासासाठी त्यांनी विशेष कार्य केले. भावसार उत्कर्ष मंडळ, भावसार प्रगती मंडळ, महाराष्ट्र भावसार समाज संस्था आणि अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभा यांच्याशी ते विविध पदांवर जोडले गेले. समाजप्रबोधनासाठी त्यांनी सातत्याने लेखन व मार्गदर्शन केले.

पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक कार्य, कामगार चळवळ, ग्राहक संरक्षण, ग्रामीण विकास, कृषी, पर्यावरण आणि संघटन कौशल्य या सर्व क्षेत्रांतील त्यांच्या दीर्घकालीन योगदानामुळे त्यांना राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावर अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले. विकास पत्रकारितेला स्वतंत्र ओळख मिळवून देणार्‍या अग्रगण्य पत्रकारांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

श्री. नागनाथ फटाले यांचे संपूर्ण आयुष्य हे प्रामाणिक पत्रकारिता, सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रभक्ती, अभ्यासपूर्ण लेखन आणि विधायक कार्याचा आदर्श नमुना आहे. त्यांनी पत्रकारितेला लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम बनविले आणि मराठवाड्याच्या विकासाचा इतिहास आपल्या लेखणीतून जिवंत ठेवला. त्यांचे कार्य आजही पत्रकार, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.

त्यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार व सन्मान असे आहेत. 1985-86 – महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय विकास पत्रकारिता पुरस्कार. 1995 – महाराष्ट्र राज्य ज्ञानदीप महासंघ, मुंबई यांचा जागतिक पर्यावरण विशेषांक सहकार्य पुरस्कार. 1997-98 – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे कै. नागोजीराव दुधगावकर पारितोषिक. 1997 – मराठवाडा कला विकास महामंडळाचा आदर्श पत्रकार पुरस्कार. 1998 – लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रलचा पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार. 2001 – बलवंत वाचनालय, औरंगाबादचा आद्य पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक कै. आ. कृ. वाघमारे स्मृती पुरस्कार. 2001 – महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समिती, औरंगाबादचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा पुरस्कार. 2001 – कै. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मुंबई यांचा राज्यस्तरीय कृषी पत्रकारिता पुरस्कार

जीवनगौरव – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा कै. नागोजीराव दुधगावकर जीवनगौरव सन्मान. औरंगाबाद महानगरपालिका – शहराचा लौकिक वाढविल्याबद्दल विशेष नागरी सत्कार. 2003 – अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभा, पुणे यांचा लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड. हिंगलाज प्रतिष्ठान, औरंगाबाद – भावसार समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान. पत्रकारिता, कृषी, पर्यावरण, सामाजिक कार्य आणि समाजप्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध शासकीय, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांकडून अनेक मानपत्रे, गौरवचिन्हे आणि सन्मान.

प्रतिक्रिया व्यक्त करा