You are currently viewing विचारातून पत्रकारिता व सामाजिक जीवन समृद्ध करणारे ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर 

विचारातून पत्रकारिता व सामाजिक जीवन समृद्ध करणारे ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर 

विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

(पाच दशकाहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात असलेल्या विजय विश्वनाथ कुवळेकर यांना 22 सप्टेंबरला नागनाथ फटाले जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा हा आढावा)

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, कवी आणि वक्ते श्री. विजय विश्वनाथ कुवळेकर यांचा जन्म २२ जानेवारी १९५२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वनगुळे येथे झाला. पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयांत बी.ए. (ऑनर्स) शिक्षण घेतलेल्या कुवळेकर यांनी तब्बल पाच दशकांहून अधिक काळ पत्रकारिता, साहित्य, चित्रपट, दूरचित्रवाणी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

‘केसरी’ आणि ‘सकाळ’पासून सुरू झालेला त्यांचा पत्रकारितेचा प्रवास पुढे सकाळ, लोकसत्ता, लोकमत, झी २४ तास आणि झी मराठी दिशा अशा प्रतिष्ठित माध्यमांच्या संपादकीय नेतृत्वापर्यंत पोहोचला. विधायक, विकासात्मक आणि समाजाभिमुख पत्रकारितेला त्यांनी सातत्याने प्राधान्य दिले. पाणीप्रश्न, गुटखाबंदी, माजी सैनिकांचे प्रश्न, सामाजिक सकारात्मकता आणि संतसाहित्य यांसारख्या विषयांना माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळवून दिले.

२००७ ते २०१२ या काळात त्यांनी राज्य माहिती आयुक्त, पुणे खंडपीठ म्हणून काम केले. माहितीच्या अधिकाराचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम राबविले. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती उपलब्ध करून देण्याचा निर्णय, सार्वजनिक अभिलेख अधिनियमाचा प्रभावी वापर आणि विशेष अपील निर्गत कार्यक्रम यांसारख्या निर्णयांमुळे त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली गेली.

साहित्य क्षेत्रात ‘शिवार’, ‘आतलं आकाश’, ‘पैलू’, ‘अर्घ्य’, ‘दिशा उसवल्या’, ‘झुंबर’, ‘प्रतिमा’, ‘संवाद’ आदी विविध साहित्यकृती त्यांनी लिहिल्या. ‘पैलू’ या लेखसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या ‘शिवार’ या दीर्घकथा संग्रहाचे इंग्रजी भाषांतर Wilderness या नावाने प्रकाशित झाले आहे.

चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्यक्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ‘रावसाहेब’, ‘तू तिथे मी’, ‘घरबाहेर’, ‘आव्हान’, ‘कुरुक्षेत्र’ आदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद व गीतलेखन केले. ‘रावसाहेब’ चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद आणि गीत या चारही लेखनासाठी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळविण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. दूरचित्रवाणीवरील विविध कार्यक्रम व मालिकांसाठी लेखन, सूत्रसंचालन तसेच हिंदी मालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रमुख भूमिका त्यांनी साकारली आहे.

पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार, नरुभाऊ लिमये पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार, पुढारी कार डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार यांसह अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

कोंकण मराठी साहित्य परिषदेच्या १७व्या मध्यवर्ती व पहिल्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाचे मॉरिशसमध्ये अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनांसह विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

सामान्य माणूस हा पत्रकारितेचा आणि प्रशासनाचा केंद्रबिंदू असावा, माध्यमांनी समाजाला केवळ हवे ते नव्हे तर समाजाला आवश्यक तेही द्यावे, या विचारातून त्यांनी पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवन समृद्ध केले. परखडपणा, सामाजिक बांधिलकी, विधायक दृष्टिकोन आणि सुसंस्कृत लेखनशैली यांचा सुंदर संगम असलेले श्री. विजय कुवळेकर हे महाराष्ट्राच्या पत्रकारिता व साहित्यविश्वातील एक मान्यवर व्यक्तिमत्त्व आहेत. दै सकाळ कोल्हापूर येथे संपादकीय पदाची धुरा वहात असताना मी विट्यासारख्या ग्रामीण भागात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो. पत्रकारिता क्षेत्रात मला त्यांनीच घडवले. त्यांना 22 सप्टेंबरला नागनाथ फटाले जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. पुरस्कार प्राप्तीबाबत त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!!

प्रतिक्रिया व्यक्त करा