You are currently viewing पुस्तकात शिवराय… मनात स्वराज्य!

पुस्तकात शिवराय… मनात स्वराज्य!

*पुस्तकात शिवराय… मनात स्वराज्य!*

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रावण महिनाभर केले छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाचे वाचन

 

*बांदा :*

श्रावण महिन्याचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने तयार केलेल्या ‘शिवचरित्र’ ग्रंथाचे महिनाभर शालेय परिपाठावेळी नियमित वाचन केले. वाचनाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, कार्य, विचार, नेतृत्व आणि स्वराज्यनिर्मितीचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेतला.१३ऑगस्ट ते ११सप्टेंबर २०२६या श्रावण महिन्याच्या हा कालावधीत हा वाचन सोहळा संपन्न झाला.या वाचन सोहळ्यात शाळेत सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महिनाभर चाललेल्या या उपक्रमात ‘शिवराय संस्कार आणि शिक्षण’, ‘शिवाजीचा राज्यकारभार’, ‘शककर्ता शिवाजी’, ‘गुणसंकीर्तन’, ‘महान नेता’, ‘व्यक्तिमत्त्व’, ‘कामगिरी’, ‘शिवरायाशी आठवावे’, ‘दिल्ली जिंकण्याची प्रतिज्ञा’, ‘अर्थनीती’, ‘धर्मनिरपेक्षता’, ‘संरक्षण संघटना’, ‘आरमार’, ‘दुर्गपुत्र शिवाजी’ तसेच ‘शिवाजी महाराजांची चित्रे’ अशा विविध घटकांचे विद्यार्थ्यांनी वाचन केले.
दररोजच्या शालेय परिपाठात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत या घटकांचे वाचन केले. त्यामुळे शिवरायांचे केवळ शौर्य आणि पराक्रमच नव्हे, तर त्यांचे कुशल राज्यकारभार, प्रभावी नेतृत्व, आर्थिक धोरण, सर्वधर्मसमभाव, संरक्षण व्यवस्था, आरमाराची उभारणी आणि दूरदृष्टी यांचीही विद्यार्थ्यांना ओळख झाली.
या उपक्रमाला विशेष प्रेरणादायी क्षण लाभला तो जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या शाळा भेटीदरम्यान. शाळेच्या परिपाठावेळी ते विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहिले आणि शिवचरित्र वाचनात स्वतः सहभागी झाले. विद्यार्थ्यांसोबत शिवचरित्र वाचन करणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांचा सहभाग मुलांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व मान्यवर यांनीही या वाचनात सहभाग नोंदवला.
श्रावणातील भक्तिमय वातावरणाला शिवचरित्राच्या वाचनाची वैचारिक आणि संस्कारमय जोड देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, इतिहासाची गोडी, प्रभावी वाचन, आत्मविश्वास आणि शिवरायांच्या विचारांप्रती आदर निर्माण झाला. शालेय परिपाठाच्या माध्यमातून महिनाभर सातत्याने झालेल्या या वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजविण्याचा प्रयत्न झाला.
‘शिवचरित्र वाचूया, शिवरायांचे विचार जगूया!’ या भावनेतून झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, प्रेरणा आणि संस्कारांचा अनोखा अनुभव ठरला. केंद्रप्रमुख ज्योत्स्ना देसाई यांनी ही शाळा भेटीवेळी या उपक्रमात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील तसेच सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा