*धनदांडग्यांच्या मायनिंगला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याला चुकीच्या प्रकरणात गोवले तर,तो कोणत्याही पक्षाचा असो,आम्ही त्याच्या पाठीशी- वैभव नाईक*
*सिद्धेश परब यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी वेंगुर्ले पोलीसांना केली विचारणा*
सिंधुदुर्ग
शिरोडा येथील शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यावर गांजा व अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली केलेली कारवाई हि सूडबुद्धीने करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी वेंगुर्ले आणि सावंतवाडीतील मायनिंग विरोधात ग्रामस्थांकडून जे आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनात सिद्धेश परब हे अग्रेसर होते. त्यामुळेच त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी करत आज वेंगुर्ले पोलीस स्टेशनला भेट देत पोलिसांना त्याबाबत विचारणा केली. धनदांडग्यांच्या मायनिंगला विरोध केला म्हणून अमली पदार्थाची कारवाई दाखवून चुकीच्या पद्धतीने एखाद्या कार्यकर्त्याला गोवले जात असेल तर त्याला आमचा विरोध राहील.मग तो कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो आम्ही त्याच्या पाठीशी राहू वेंगुर्ले पोलिसांनी सूडबुद्धीने किंवा पक्षपाती कारवाई न करता योग्य पद्धतीने तपास करावा अशी मागणी वैभव नाईक यांनी केली. यावेळी जि.प. सदस्य संजय गावडे, जि. प. सदस्य विजय नाईक, काँग्रेसचे इर्शाद शेख, काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, सुमन कामत आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले, शिरोडा येथे काल शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांना अटक करण्यात आली आहे. याची सर्व माहिती आम्ही घेतली असता काही दिवसांपूर्वी धनदांडग्यांच्या वेंगुर्ले आणि सावंतवाडीतील मायनिंग प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांकडून जे आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनात सिद्धेश परब हे अग्रेसर होते. त्यामुळेच सिद्धेश परब यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असे येथील स्थानिक नागरिकांचे आणि मायनिंग विरोधी कृती समितीचे म्हणणे आहे. त्यांनी मला सिद्धेश परब यांच्या पाठीशी राहण्याची विनंती केली असून जरी सिद्धेश परब शिंदे गटाचे कार्यकर्ते असले तरी त्यांच्या विरोधात जे राजकारण सुरू आहे ते चुकीचे असल्याने ज्याप्रमाणे इतर आंदोलकांच्या पाठीशी आम्ही राहिलो त्याचप्रमाणे सिद्धेश परब यांच्या देखील पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत.
सत्ताधारी आपल्या विरोधातील प्रत्येकावर सूडबुद्धीने कारवाई करत आहेत. आंबा काजूच्या नुकसान भरपाईसाठी तसेच अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलन झाले तेव्हा देखील राजू शेट्टींसह माझ्यावर आणि शेतकऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. देवगडमध्ये सूडबुद्धीने खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले. एलईडी मच्छिमारी विरोधातील आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. सरकारच्या एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी ग्रामस्थांनी विरोध केला म्हणून त्यांच्यावर सूड बुद्धीने कारवाई करण्यात येते हा चुकीचा पायंडा जिल्ह्यात घातला जात आहे.
सिद्धेश परब प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दोडामार्ग मधील सासोली आणि वेंगुर्लेतील दाभोली जमीन गैरव्यवहार प्रकरणात केलेला तपास संशयास्पद आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सिद्धेश परब प्रकरणाचा तपास निसर्ग ओतारी यांच्याकडून काढून घ्यावा आणि सक्षम पोलीस अधिकाऱ्यांकडे हा तपास देण्यात यावा. वेंगुर्ले पोलीसांच्या कारवाईची आम्ही माहिती घेतली त्यात गेल्या वर्षभरात गांजा आणि अमली पदार्थाची एकही केस दाखल झालेली नाही. सिद्धेश परब जर गांजा पुरवठा करत असतील तर गेल्या वर्षभरात एक तरी केस तालुक्यात दाखल व्हायला हवी होती. अमली पदार्थांच्या सेवन आणि विक्रीला आमचा कायमच विरोध आहे. परंतु, अमली पदार्थाची कारवाई दाखवून चुकीच्या पद्धतीने एखाद्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला अडकवले जात असेल तर ते चुकीचे असून सिंधुदुर्ग वासियांनी त्याचा विरोध केला पाहिजे. पोलिसांनी देखील पक्षपाती भूमिका न घेता या प्रकरनाचा योग्य पद्धतीने तपास करावा अशी आमची मागणी असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
