*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका ज्योतिषी सौ.अवनी आदित्य जोशी लिखित अप्रतिम लेख*
*”निसर्ग एक शिक्षक”*
(चकवा, चक्रव्यूह की अद्भुत खजिना)
माझा जन्म तळेगांव दाभाडे येथे झाला. तेव्हाचे म्हणजे साधारण ३७ वर्षांच्या पूर्वीचे तळेगांव, हे निसर्गाच्या दृष्टीने, फार घनदाट वृक्ष वेलींनी बहरलेले होते. आमच्या शाळेच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर खूप झाडीझुडपे होती. तेथे धोत्र्याची फुले आणि इतर अनेक मोहक झाडेफुलें दिसत. आणि आम्ही वर्गमित्र ती पाहण्यात तोडण्यात आनंद घेत त्यांच्यात भुलले जायचो. ती विषारी फुलं आहेत अस काही फारसं ज्ञान नव्हतं तेव्हा. खरतर त्या फुलांचा, झाडांचा रंग आणि मादक वास हा, चकवा लावणारा, संमोहित करून वेळेच्या आणि धुंदीच्या चक्रव्यूहात अडकवून ठेवणारा होता, तसे आम्ही, आणि अनेक वाटसरू तेथे अडकले पण काही काळ. पण अपाय कधीच झाला नाही.
आमचे घर बैठे. वरती मोठी गच्ची होती, उन्हाळ्यात रात्री तेथे झाडावर एक घुबड बसायचे, आणि गच्चीच्या कठड्यावर आमचे पाळलेले मांजर बसायचे. आम्ही सोसायटीतील मुले गच्चीत झोपायचो, तेव्हा ते दोघे एकटक एकमेकांना बघत, आणि आम्ही सर्व एकटक त्या दोघांना बघत. घुबडाचे डोळे खूप बोलके, विलक्षण, आणि दृष्टी खिळवून ठेवणारे असतात, मोहित होऊन कुतूहलाने, त्याच्याचकडे बघत राहण्याच्या संमोहन चक्रव्यूहात भुलण्याचा प्रसंग हा असे. पण तेथेही कधी भीती वाटली नाही. किंवा आम्ही कोणी घाबरलो नाही.
रात्री नांदूरकीच्या (वड) झाडाला वटवागुळ पाहायचो, किती ते कर्णकर्कश ओरडतात ती, आणि रातकिडे पण, हे सगळं पण शांतपणे बघत बसायचो, त्या रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यात, तेही चकवा लावणारच दृश्य.
गावात एक पडका बांगला होता. घुमटाची विहीर आहे, नासके तळे आहे. ह्या सर्व ठिकाणी जाऊ नका. अशी तंबी दिली होती. कारण अशा ठिकाणी जाऊन वाट चुकले, आणि तिथेच खेळत बसले, तर उद्या त्या तळ्यात, आमच्यातील कोणी, पडण्याची भीती होती, तसेच विहीर खोल होती. पण “नका जाऊ म्हणजेच जायचेच” मग सुट्टीत सर्व मुले आसपासची,वर्गसोबती मिळून जायचो, आणि कुतुहलाने सर्व पाहायचो. ते पाहण्यात सुट्टीच्या सुट्टी, आम्ही तिथेच भटकंती करण्यात घालवायचो. तो एक चक्रव्यूहच होता, तिथे जाऊन वेगवेगळे आवाज द्यायचो, ते घुमल्यासारखे ऐकू यायचे. असे का? ते तसे का? कुतूहलाने वाचन करायचो, मुक्त फिरायचो.
निसर्गाच्या रूपातून सर्व संमोहित करणारे, चकवा देणारे, चक्रव्यूह खरतर आम्ही लहानपणापासून पाहिले अनुभवले. फरक फक्त इतकाच की हे चक्रव्यूह आहे, हेच त्या वयात कळत नव्हतं. आणि तरी ज्ञान सर्व मिळत होत.
माझे गाव आणि तेथील सर्व निसर्ग आणि सर्व प्रसंग, सगळं मोहित करणारे भुलभुलैया,असच सर्व तेव्हा होत. कशाला हवा परदेश प्रवास? सगळं काय ते तिथेच पाहिलं,अनुभवलं आणि त्यातूनच शिकलो. शिकलो हेच की, धाडसी झालो, कोणी फसवू वगैरे शकणार नाही. कारण आम्हीच एक असामान्य असे बनले आहोत. सर्व डोळसपणे पाहण्याची, न घाबरण्याची आणि शिकण्याची, जाणण्याची कला, आपोआप रुजत गेली. आणि पालकांनीही कधी बंधनकारक नियम न लावला, “फुले तृणातील इवली” अस, आम्हाला बालकांना समजून, मुक्त आयुष्य जगू दिलं.
याप्रमाणे निसर्गात सर्वत्र असे अनेक चकवे सदृश्य चक्रव्यूह भरलेलेच आहेत. पण निसर्गातील या गोष्टींना आणि या निसर्गाच्या देवतेस आपण त्रास दिला नाही तर, ती देवता हा निसर्ग आपल्याला कधीच त्रास देत नाही. उलट निसर्ग स्वतः च त्याच हे अद्भुत ज्ञानरुपी पुस्तक, रोज नवीन रुपाने आपल्याला वाचायला देतो. आता यास चक्रव्यूह, चकवा समजायचं, की “माहितीचा खजिना” ते आपण ठरवायचे.
“निसर्ग हा आपुला मित्र
सांगे तो रहस्य चरित्र
मिळुनी रक्षण करू एकत्र
असे महान कार्य हे पवित्र”
सौ. अवनी आदित्य जोशी.(दारशेतकर)
तळेगांव दाभाडे.
जि. पुणे.
