प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह प्रमुख नेते राहणार उपस्थित
सावंतवाडी :
भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक येत्या ९ सप्टेंबरला सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील ४०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या धर्तीवर सावंतवाडीत होणाऱ्या या बैठकीला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभणार आहे. या बैठकीस प्रमुख नेत्यांसोबत आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार प्रमोद जठार, अतुल काळसेकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील.
बैठकीदरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी विकासकामांचा अभिनंदन ठराव मंजूर करण्यात येणार असून, राजकीय प्रस्तावही सादर केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी २५ वर्षांची यशस्वी राजकीय कारकीर्द पूर्ण झाल्यानिमित्त १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे. या देशव्यापी उपक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि रूपरेषा या कार्यकारिणी बैठकीत ठरवली जाणार असल्याचे प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, सहकार आघाडीचे जिल्हा संयोजक रवी मडगावकर, उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, तालुका मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, वेंगुर्ले तालुका मंडळ अध्यक्ष पप्पू परब, शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, नगरसेवक अँड. सिद्धार्थ भांबुरे, माजी सभापती पंकज पेडणेकर, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, दिलीप भालेकर आणि सागर ढोकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
