You are currently viewing कसा आहे माझा कृष्ण

कसा आहे माझा कृष्ण

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कसा आहे माझा कृष्ण?*

 

गोकुळच्या मातीवर

अनवाणी धावणारा,

यशोदेच्या पदराला धरून

विश्वाची सारी गुपिते

डोळ्यांत लपवणारा…

 

कधी ओठांवर मुरली,

कधी हातात गोवर्धन,

कधी राधेच्या विरहात विरघळणारा,

तर कधी हजारो प्रश्नांच्या गर्दीत

अर्जुनाला कर्तव्याचा मार्ग दाखवणारा..

 

माझा कृष्ण

फक्त देव्हाऱ्यातला नाही,

तो आहे अन्यायासमोर न झुकणाऱ्या

प्रत्येक माणसाच्या धैर्यात..

 

तो सुदाम्याच्या मुठभर पोह्यांत

मैत्रीची श्रीमंती शोधतो,

द्रौपदीच्या हाकेत

स्त्रीच्या सन्मानाची वेदना ऐकतो,

तो रणांगणातही

शस्त्रापेक्षा विचार मोठा करतो,

कर्माला पूजा मानतो आणि परिणामाची चिंता

माणसाच्या हातातून अलगद काढून घेतो..

 

म्हणूनच मला आवडतो

माझा हा कृष्ण—

मोरपिसाइतका कोमल,

सुदर्शनाइतका तेजस्वी,

मुरलीसारखा मधुर

आणि सत्यासाठी

वज्रासारखा कठोर!..

 

कसा आहे माझा कृष्ण?

 

तो शोधावा लागत नाही—

जिथे प्रेम आहे,

जिथे मैत्री आहे,

जिथे माणुसकी जिवंत आहे,

तिथेच

माझा कृष्ण उभा आहे….!!

 

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा