You are currently viewing कालव्याचे काम निकृष्ट असल्यास पाटबंधारे विभागाला जाब विचारणार

कालव्याचे काम निकृष्ट असल्यास पाटबंधारे विभागाला जाब विचारणार

देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील आचिर्णे, गडमठ येथील कामाच्या दर्जावरून सभापती सिद्धेश रावराणे नाराज

वैभववाडी :

देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत आचिर्णे आणि गडमठ येथे सुरू असलेल्या कालव्याच्या कामाच्या दर्जावरून पंचायत समितीच्या मासिक सभेत सभापतींनी नाराजी व्यक्त केली. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. कामात सुधारणा न केल्यास चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

पंचायत समितीची मासिक सभा सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती साची कोलते, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, सदस्य सुवर्णा संसारे, मंगेश लोके, साधना नकाशे, देवानंद पालांडे आदी उपस्थित होते.

देवधर प्रकल्पाच्या कालव्याचे काम आचिर्णे आणि गडमठ परिसरात सुरू असून, पाइपलाइनचा वापर करून हे काम करण्यात येत आहे. मात्र, काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला. याबाबत पाटबंधारे विभागाला यापूर्वी माहिती देण्यात आली असतानाही संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सभापती रावराणे यांनी सांगितले.

सध्या सुरू असलेल्या कामाचा दर्जा योग्य नसल्यास भविष्यात पाइपलाइनमधून पाणी वाहून जाताना अडचणी निर्माण होऊ शकतात. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार नाही आणि सिंचन क्षेत्र वाढविण्याचा प्रकल्पाचा उद्देशही अपूर्ण राहील, अशी चिंता सभेत व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी आणि कामाची गुणवत्ता तपासावी, अशी सूचना सभापती सिद्धेश रावराणे यांनी केली. निकृष्ट काम कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळावा आणि सिंचन क्षेत्र वाढावे, हा उद्देश आहे. मात्र, कामाच्या गुणवत्तेतच त्रुटी राहिल्यास या प्रकल्पाचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने कामाची पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशी मागणी सभेत करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा