मिरज (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : महिलांच्या समस्या, अपेक्षा, अडचणी आणि त्यांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी आवश्यक उपाययोजना जाणून घेण्यासाठी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘हितगुज – सत्र क्र. १’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज येथे करण्यात आले.
महिलांसाठी केवळ मार्गदर्शन न करता त्यांच्या मनातील प्रश्न थेट जाणून घेणे, त्यांच्या अनुभवांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींशी जोडणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमात महापालिका आयुक्त श्रीमती संजीता महापात्रा यांच्या हस्ते विविध महिला बचत गटांना एकूण ₹४३ लाख ५० हजार इतक्या रकमेचे कर्ज वितरण करण्यात आले. IDBI बँकेचे शाखा अधिकारी श्री. परशुराम सर यांच्या उपस्थितीत ही कर्ज वितरणाची प्रक्रिया पार पडली.
हितगुज’मधून महिलांशी मनमोकळा संवाद करण्यात आला. “आपलं मत, आपला सहभाग, आपला बदल” या विचारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘हितगुज’ कार्यक्रमामध्ये महिलांनी आपल्या समस्या, अनुभव, अपेक्षा आणि भविष्यातील संधींबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला.
महिलांना शासनाच्या विविध योजना, बचत गटांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या आर्थिक संधी, कौशल्य प्रशिक्षण, रोजगारनिर्मिती आणि स्वयंरोजगाराच्या विविध मार्गांची माहिती देण्यात आली.
महिलांनी केवळ योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी न राहता स्वतः रोजगार निर्माण करणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि निर्णय प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणाऱ्या महिला उद्योजिका बनावे, यावर कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.
बचत गटातील महिलांना ₹४३.५० लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून कार्यक्रमात विविध महिला बचत गटांना एकूण ₹४३.५० लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले.
कर्ज वितरण करण्यात आलेल्या बचत गटांमध्ये गगनगिरी महिला बचत गट, गंगामाई महिला बचत गट, आरंभ महिला बचत गट, तेजस्विनी महिला बचत गट, महालक्ष्मी महिला बचत गट, रमाई महिला बचत गट, कोहिनूर महिला बचत गट यांचा समावेश आहे.
महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन उपलब्ध आर्थिक साधनांचा योग्य वापर करून उत्पन्ननिर्मिती, व्यवसायवृद्धी आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये महिलांच्या सक्षमी करणाची गरज अधोरेखित करताना महिलांना काम देणे, त्यांना योग्य दिशा दाखवणे आणि त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणे या तीन बाबींवर विशेष भर देण्यात आला.
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत होते. त्यातून मुलांचे शिक्षण, आरोग्य, जीवनमान आणि कुटुंबातील निर्णयक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडे केवळ महिलांचा विषय म्हणून न पाहता संपूर्ण कुटुंब व समाजाच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणून पाहण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
यावेळी महिलांना प्रेरणा देताना मेळघाटातील महिलांच्या सामूहिक प्रयत्नांचे उदाहरण देण्यात आले. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी महिलांनी एकत्र येऊन निष्ठेने व सातत्याने प्रयत्न केल्यास आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणता येते, असा संदेश देण्यात आला.
महिला सक्षमीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी परिसरातील अधिकाधिक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.
“आपल्या आजूबाजूच्या महिलांनाही बचत गटामध्ये सहभागी करून घ्या”, असे आवाहन करण्यात आले. बचत, परस्पर सहकार्य, कौशल्यविकास आणि सामूहिक व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
महिलांना केवळ प्रशिक्षण देऊन थांबण्याऐवजी त्यांच्या कौशल्याला काम, बाजारपेठ आणि उत्पन्नाशी जोडणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
महापालिकेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध स्किल ट्रेनिंग कार्यक्रम, बचत गटांना मार्गदर्शन, महिला उत्पादनांची प्रदर्शने, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन, आर्थिक सहाय्याशी जोडणी, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न अशा विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
यापुढेही महिलांच्या गरजा लक्षात घेऊन महिनेवारी नियोजन करून सातत्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे.
कार्यक्रमातील चर्चेत “महिलांना काम देणे आवश्यक आहे” हा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. महिलांकडे असलेले पारंपरिक कौशल्य, अनुभव आणि क्षमता यांना आधुनिक प्रशिक्षणाची जोड देऊन त्यातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहणार आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक असलेली दिशा, प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि बाजारपेठेशी जोडणी उपलब्ध करून देणे, हे महिला सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम ठरू शकते.
‘हितगुज’ उपक्रमाच्या माध्यमातून महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यापुढील काळातही महिलांच्या गरजा आणि सूचनांनुसार अशा संवाद कार्यक्रमांचे आयोजन करून “महिलांचे म्हणणे ऐकून घेणे – समस्या समजून घेणे –उपाययोजना करणे – त्याचा परिणाम तपासणे” या पद्धतीने कामकाज करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास महापालिका आयुक्त श्रीमती संजीता महापात्रा, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती श्रीमती बानू जमादार, उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील, श्रीमती विद्या पाटील, श्रीमती अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त श्री. साई दडस, श्रीमती महादेवी कुरणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्रीमती सुचेता पवार, लेखा परीक्षा अधिकारी श्रीमती विद्यागौरी खांडेकर तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी, IDBI बँकेचे शाखा अधिकारी श्री. परशुराम आणि मोठ्या संख्येने महिला बचत गटांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अजीविका/आजीविका योजनेच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्योती सर्वदे, मतीन अमीन, किरण पाटील, वंदना सवाखंडे, संपदा मोरे, शाईन शेख आणि सदाशिव हंकारे यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी पार पाडली.
‘हितगुज’ हे केवळ एकदिवसीय कार्यक्रम न राहता महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने संवाद साधणारे आणि त्यातून प्रत्यक्ष कृती घडवून आणणारे व्यासपीठ ठरावे, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे.
महिलांना काम, कौशल्याला संधी, बचत गटांना आर्थिक बळ आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यावर आगामी काळात विशेष भर देण्यात येणार आहे.
“महिला सक्षम झाली की कुटुंब सक्षम होते; कुटुंब सक्षम झाले की समाज सक्षम होतो आणि सक्षम समाजातून सक्षम शहराची निर्मिती होते.”
हीच ‘हितगुज’ उपक्रमामागील व्यापक भूमिका असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
