You are currently viewing अल्पवयीन मुलीला फोन, व्हॉट्सॲप संदेश व पाठलाग केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

अल्पवयीन मुलीला फोन, व्हॉट्सॲप संदेश व पाठलाग केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

अल्पवयीन मुलीला फोन, व्हॉट्सॲप संदेश व पाठलाग केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

सरकारी पक्षाकडून सात साक्षीदार तपासले; कथित व्हॉट्सॲप चॅटिंगचा ग्राह्य पुरावा सिद्ध न झाल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद

आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले.

ओरोस, 

अल्पवयीन मुलीला फोन करून व्हॉट्सॲपवर संदेश पाठवणे, प्रेमाची मागणी करणे, नकार दिल्यानंतर धमकी देणे तसेच तिचा वारंवार पाठलाग करून त्रास दिल्याच्या आरोपातून समीर मनोहर जाधव (रा. मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) यांची मे. विशेष सत्र न्यायालय, ओरोस यांनी सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३/२०२२ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३५४-ड (१), ५०७ तसेच पोक्सो अधिनियम कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकारी पक्षाच्या आरोपानुसार, आरोपीने आपल्या मोबाईल क्रमांकावरून अल्पवयीन पीडित मुलीच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून तसेच फोन करून संपर्क साधला. त्यानंतर तिच्याकडे प्रेमाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

पीडित मुलीने प्रेमाच्या मागणीस नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्या कुटुंबीयांना कथित व्हॉट्सॲप चॅटिंग दाखवून प्रेमसंबंध असल्याचे सांगण्याची धमकी दिल्याचा आरोप होता. तसेच आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार फोन करून व व्हॉट्सॲप संदेश पाठवून तिचा पाठलाग करून त्रास दिल्याचेही आरोप करण्यात आले होते.

सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदारांची साक्ष

सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. दरम्यान, आरोपीच्या वतीने बाजू मांडताना अॅड. अशपाक शेख यांनी कथित व्हॉट्सॲप चॅटिंगसंदर्भात आवश्यक व ग्राह्य पुरावा न्यायालयासमोर सिद्ध झालेला नसल्याचा मुद्दा मांडला.

तसेच गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब, आरोपीने पीडितेचा वारंवार पाठलाग केल्याचा आरोप आणि धमकी दिल्याची बाब उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार केल्यानंतर मे. विशेष न्यायाधीश श्री. एस. टी. त्रिपाठी, ओरोस यांनी दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी निकाल देताना समीर मनोहर जाधव यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.

आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी मुख्य काम पाहिले. त्यांना अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, अॅड. भूषण कदम आणि अॅड. हरेश वरवडेकर यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा