*अचूक व पारदर्शक पीक नोंदणीसाठी काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना*
कुडाळ :
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी DCS MH Digital Crop Survey ॲप उपक्रमांतर्गत खरीप हंगाम २०२६ पासून सुरू करण्यात आलेल्या डिजिटल पीक पाहणीच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज कुडाळ तालुक्यातील अणाव गावास भेट देऊन क्षेत्रीय स्तरावर कामकाजाची पाहणी केली.
खरीप हंगाम २०२६ पासून ई-पीक पाहणीचे काम नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यकांमार्फत DCS MH ॲपच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अणाव येथील डिजिटल पीक पाहणी कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन डिजिटल पद्धतीने पीक पाहणी कशा प्रकारे केली जाते, पीक नोंदणीची प्रक्रिया कशी राबविली जाते, तसेच प्रत्यक्ष पाहणीदरम्यान कोणत्या अडचणी येतात, याची माहिती घेतली. याशिवाय शेतकऱ्यांना या प्रक्रियेदरम्यान भेडसावणाऱ्या समस्यांबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी नियुक्त सहाय्यकांशी संवाद साधून डिजिटल पीक पाहणीचे काम अचूक, पारदर्शक आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पीक नोंदणी करताना प्रत्यक्ष परिस्थितीची अचूक नोंद घेण्याबरोबरच कोणतीही माहिती चुकीची अथवा अपूर्ण राहणार नाही, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी सांगितले.
डिजिटल पीक पाहणी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग आणि सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करून जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी शेतकऱ्यांना आवश्यक माहिती देण्याबरोबरच त्यांच्या अडचणींचे तत्परतेने निराकरण करण्यावर भर देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पीक पाहणी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी केलेल्या पाहणीमुळे नियुक्त सहाय्यकांना आवश्यक मार्गदर्शन मिळाले.
या भेटीवेळी कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, ग्राम महसूल अधिकारी ऐश्वर्या वालावलकर, रणजीत कदम, अणावचे सरपंच, DCS MH अंतर्गत नियुक्त सहाय्यक तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
