You are currently viewing गणपतीपूर्वी रस्त्यांची डागडुजी न झाल्यास १० सप्टेंबरनंतर आंदोलनाचा इशारा

गणपतीपूर्वी रस्त्यांची डागडुजी न झाल्यास १० सप्टेंबरनंतर आंदोलनाचा इशारा

गणपतीपूर्वी रस्त्यांची डागडुजी न झाल्यास १० सप्टेंबरनंतर आंदोलनाचा इशारा

बोर्डवे येथे शिवसेना पक्षाची तातडीची बैठक; ग्रामपंचायत निवडणुकीसह गावविकासाच्या मुद्द्यांवर चर्चा

बोर्डवे कणकवली

बोर्डवे गावातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक श्री. गुणाजी खादारे यांच्या निवासस्थानी कळसुली विभागप्रमुख श्री. चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत गावातील विविध विकासकामांसह आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रमुख रस्त्यांची कच्च्या स्वरूपातही डागडुजी करण्यात आली नाही, तर १० सप्टेंबरनंतर केव्हाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या वाहतुकीचा त्रास लक्षात घेता रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत देवळी यांचा सत्कार
दरम्यान, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. हनुमंत देवळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील कार्यास उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी
बैठकीत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भातही चर्चा करण्यात आली. सरपंच पदासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. तसेच पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी गावातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस गावातील प्रमुख शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामविकासाच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्यासोबतच संघटनात्मक बांधणीवरही भर देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा