You are currently viewing राम हवा की श्याम

राम हवा की श्याम

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योतिषी सौ.अवनी आदित्य जोशी (दारशेतकर) लिखित अप्रतिम लेख*

 

“राम हवा की श्याम”

 

“देवकी नंदन, माधव नाम

यशोदेचा कान्हा, हा घनश्याम.”

 

युग परंपरा सुरू झाली आणि प्रत्येक युगाच्या चौकडीत जनमाणसावर घडणारे अन्याय निवारण करून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच धर्म, अहिंसा, सत्य यांचे महत्व सांगण्यासाठी भगवंताने निरनिराळ्या रुपात अवतार घेतले.

 

अवतार रुपी राम आणि श्याम (श्रीकृष्ण) यांचे धर्मरक्षण कार्य एकच असले तरी अवतारातील त्यांचा कर्म महिमा मात्र वेगवेगळा होता. पैकी राम हवा की श्याम म्हणताना, कोणालाही प्रामुख्याने भावला, आवडला तो श्यामच.

 

माधवाने धर्मरक्षण कार्य केले ते लीला रूपातून, अर्जुनास गीता सांगून, धर्मासाठी युद्ध करून न्याय मिळवून दिला. कंस मामास धडा शिकवला. द्रौपदीस न्याय मिळवून दिला. राधेचा प्रेमसखा झाला. तर सत्यभामा, रूक्मिणीशी विवाह करून संसार केला. हे माधवाचे लीलारूप अवतार कार्य, न्याय मिळवून देण्याचे लीला कौशल्य सर्व जनास फार आवडते. म्हणून श्याम हवाहवासा वाटतो. तर,

 

“सांगा भव सागरी या कैसेची तरावे,

श्रीराम नाम नित्य मनी स्मरावे”.

 

या ओळींच्या प्रमाणे या जीवनरुपी सागरात तरुन जाण्यासाठी सदा मुखी श्रीराम नाम घ्यावे. प्रभू श्रीराम न्यायी,त्यागी होते. सत्य, अहिंसा, आसक्तीचे त्यागी, एकवचनी, एकबाणी, संयमी होते.

 

“श्रीराम” हा भगवंत अवतार सत्य, अहिंसा, न्याय, त्याग, सर्व शिकवतो. परंतु कोणतेही लीलारूपी कार्य या अवतारात नाही. ते स्वतः चौदा वर्ष वनवास भोगतात. राज्यत्याग करतात. सीतेसही वेळप्रसंगी अग्नीपरीक्षा देण्यास सांगतात. म्हणून हा न्यायी, त्यागी, अहिंसावादी, एकवचनी, एकबाणी एव्हढा गुणसंपन्न “श्रीरामप्रभू” अवतार असूनही साध्या निर्मळ जनमाणसाच्या मनास मात्र फारसा भावत नाही.

 

म्हणजे लीलारूप चमत्काराशिवाय, नमस्कार मनोभावे घडत नाही. मनाची गोडी ओढ घेत नाही. असे काहीसे होते. तरी राम हवा की श्याम? असा विचार न करता आपण सकळ जनांनी सामान्यतः जीवन जगत असताना सत्य, अहिंसा, धर्मरक्षण, आसक्तीचा त्याग, दानधर्म करणे, सेवा करणे, एकवचनी, एकबाणी होणे आणि हे सर्व गुण आचरणात आणणे म्हणजेच राम आणि श्याम स्वरूप आपल्या अंतरात्म्यात विरघळणे आणि आपला नर जन्म सार्थकी लागणे होय.

 

“रामकृष्णहरी” असे नाम घेऊन केलेले सर्व कार्य हे नेहमी पूर्णत्वास जाते. आणि भगवंत भक्ती आणि सेवा कार्य एकत्रच निर्विकार पार पडते. हे सर्वांनी जाणावे.

 

“घेऊनी हा नर जन्म,

पाळावा सत्य धर्म.

घेऊनी रामकृष्ण नाम

करावे नित्य, सत्य कर्म.”

 

सौ. अवनी आदित्य जोशी.(दारशेतकर)

तळेगांव दाभाडे.

जि. पुणे.

मो. न. ८८७९६८८८५८.

प्रतिक्रिया व्यक्त करा