देवगड :
कमी जागेत अधिक उत्पादन घेण्याच्या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे बंदिस्त खेकडा संवर्धनाबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन पडेल येथे १ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता करण्यात आले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य संशोधन केंद्र, मुळये आणि ग्रामपंचायत पडेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पडेलचे सरपंच भूषण पोकळे आणि पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरूल यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. खेकडा संवर्धन व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कल्पेश शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी खेकड्यांची योग्य निवड व हाताळणी, बंदिस्त संवर्धनासाठी आवश्यक सुविधा, पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन, खाद्य व आहार व्यवस्थापन, स्वतंत्र कप्पा पद्धतीने संवर्धन, आरोग्य व रोग व्यवस्थापन, वाढ व उत्पादन तसेच बाजारपेठ, विक्री व आर्थिक नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह आधुनिक खेकडा संवर्धन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असल्याने मत्स्य व्यावसायिक, शेतकरी तसेच खेकडा संवर्धनात इच्छुक युवकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. कमी जागा, योग्य तंत्रज्ञान आणि शास्त्रीय व्यवस्थापनातून अधिक उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
