*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावणरंग*
(वृत्त चंचला)
श्रावणात वाहतात मंद मंद थंड वात
अंबरात मेघ कृष्ण घोर कोण दाटतात
कृष्णवेणु वाजताच सूर गुंजती वनात
भान जातसे हरून श्यामरंग अंतरात
माळ रान धुंद होत नाचतात मोर छान
वाहते नदी निवांत ठेवुनी प्रवाह भान
शुभ्र मोगरा गुलाब गंध दाटतो मनात
सप्तरंग लावती कमान खास ती नभात
न्हाउनी धरा सचैल तृप्त होतसे सुखात
श्रावणात हर्ष दाटतो किती मनामनात
कृष्ण कृष्ण नामघोष नित्य रोज अंतरात
गोपगोपिकांसवेच नादतो दिगंतरात
नेम धर्म चालतात लक्ष हार वाहण्यास
दंग होत अर्चनेत देवळात जावयास
मोह घालतो मनास रंगतात खेळ खास
ओढ लावतो मनास श्रावणा तुझाच मास
©️®️ डॉ मानसी पाटील
