You are currently viewing चैतन्य पालवी

चैतन्य पालवी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चैतन्य पालवी* 

(हरिभगिनी ८+८+८+६)

 

मेघ उघडतो दार रुपेरी हळू बरसती जलधारा

स्पर्शाने त्या जलधारांच्या तृप्त जाहली वसुंधरा

 

पानोपानी मोत्यांचाही कशिदा सुंदर चितारला

वाऱ्या संगे डोलत डोलत मल्हाराला आळविला

 

थेंब शिकवती आरशासही रीत नवीही हसण्याची

वाटांवरच्या खुणा ओलसर कथती भाषा प्रीतीची

 

पावसातुनी नभ पाठवितो एक पत्र या धरतीला

थेंबामध्ये असतो म्हणती प्रेममंत्रची दडलेला

 

लखलख चपला‌ अंबरातुनी क्षणात रेषा उमटविते.

काळजातला चुकतो ठोका भयकंपित का मन‌ होते

 

सरींच्यासवे इंद्रधनूचे रंग मनोहर बघ हसती

चैतन्याच्या पालवीतुनी मनात आशा मग फुलती

 

पाउस पडता स्वच्छ जाहली धूळ मनावर जमलेली

आठवणींच्या अंगणी पुन्हा कळी उमलुनी आलेली

 

सरी थांबल्या तरी उरे बघ सुगंध ओल्या मातीचा

पाउस सदैव सांगत जातो उपाय साधा जगण्याचा

 

©️®️ डॉ मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा