निकृष्ट झाडी कटाईचे काम ग्रामस्थांनी रोखले; दर्जेदार कामाची PWDची ग्वाही
आरोस-दांडेली-न्हावेली रस्त्याची पाहणी; शरद धाऊसकर यांच्या पाठपुराव्याला यश, पर्यवेक्षक नियुक्त करण्याचे आश्वासन
आरोस-दांडेली :
न्हावेली ते आरोस-दांडेली रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी कापण्यासाठी संबंधित ठेकेदाराला कंत्राट देण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराकडून झाडी योग्य पद्धतीने न कापता केवळ रस्त्याच्या कडेची झाडे अयोग्य पद्धतीने कापली जात असल्याने कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी आक्षेप घेतला.
हा प्रकार निदर्शनास येताच आरोस-दांडेली व न्हावेली येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर या निकृष्ट कामाची माहिती पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
ग्रामस्थांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत शरद धाऊसकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) वरिष्ठ अधिकारी श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पाटील यांनी सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन रस्त्यावरील झाडी कटाईच्या कामाची पाहणी केली.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच एसटी प्रवाशांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने दर्जेदार काम करून घेतले जाईल, अशी ग्वाही शरद धाऊसकर व श्री. पाटील यांनी दिली. तसेच कामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी शासकीय पर्यवेक्षक (Supervising Officer) नियुक्त करण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात आले.
ग्रामस्थांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करत दर्जेदार कामाची ग्वाही दिल्याबद्दल आरोस-दांडेली ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. काम पूर्ण होईपर्यंत कोणतीही त्रुटी अथवा चुकीची बाब निदर्शनास आल्यास ती तात्काळ लक्षात आणून द्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आरोस-दांडेलीचे माजी सरपंच कृष्णा पालयेकर, न्हावेलीचे माजी उपसरपंच विठोबा गावडे, दुर्गेश मोरजकर, संदीप माणगावकर, ओंकार नाईक, हनुमंत पटेकर, गौरेश पाटकर, सिद्धेश आरमारकर, सागर धाऊसकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
