You are currently viewing ओरोस पेट्रोल पंप चोरीप्रकरणी पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता

ओरोस पेट्रोल पंप चोरीप्रकरणी पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता

ओरोस पेट्रोल पंप चोरीप्रकरणी पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता

५७ हजार रुपयांच्या चोरीचा होता आरोप; सरकार पक्षाला ठोस पुराव्याने आरोप सिद्ध करण्यात अपयश

ॲड. अशपाक शेख यांनी केला  यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्गनगरी :

ओरोस-खर्येवाडी येथील सिद्धी ऑटोमोबाईल पेट्रोल पंपावरील ५७ हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी आरोप ठेवण्यात आलेल्या पाचही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मे. २रे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग येथील न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती स्वाती जे. पाटील यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी हा निकाल दिला.
अब्दुल रज्जाक अब्दुल हमीद खान, मीर बादशाह शेख, प्रमोद प्रकाश गायकवाड, सोहेल युनुस काझी आणि राजेश गुणाजी मासवकर अशी निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३/२०२२ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३७९ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीनुसार, १ जानेवारी २०२२ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी पेट्रोल पंपावर सीएनजी व पेट्रोल भरण्यासाठी आले होते. सीएनजी व पेट्रोल भरल्यानंतर पंपावरील कर्मचारी सीएनजी पंपाकडे गेला असता, आरोपींनी संधी साधून पंपाच्या बाजूला स्वॅब मशीन ठेवण्यासाठी असलेल्या प्लास्टिक बॉक्समधील ५७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून कारमधून पळून गेल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी क्रमांक ५ यांच्या मालकीची सेलेरिओ कार (क्रमांक एमएच ०४-केएफ २७४८) वापरण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
सदर प्रकरणात सरकार पक्षाने फिर्यादीसह एकूण आठ साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदविली. मात्र, आरोपींचा कथित गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग तसेच चोरीचा आरोप ठोस व विश्वासार्ह पुराव्याच्या आधारे सिद्ध करण्यात सरकार पक्षाला यश आले नाही.
आरोपींच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी सविस्तर युक्तिवाद केला. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा हा आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी अपुरा व विसंगत असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, उपलब्ध पुरावे व अभिलेखांचा सखोल विचार केल्यानंतर न्यायालयाने पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, अॅड. भूषण कदम, अॅड. असीम मुजावर आणि अॅड. हरेश वरावडेकर यांनी सहाय्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा