सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सीटीस्कॅन सेवा पुन्हा सुरू
बेंगळुरूहून एक्स-रे ट्यूब मागवून तातडीने दुरुस्ती;
‘हलगर्जीपणा’च्या बातम्या टाळण्याचे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे आवाहन
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीनची एक्स-रे ट्यूब नादुरुस्त झाल्याने रविवारी काही काळ सीटीस्कॅन सेवा बंद होती. दरम्यान, आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने येताना बोर्डी पुलाजवळ झालेल्या अपघातातील दोन रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार व ड्रेसिंग करण्यात आले. यातील एका रुग्णाच्या छातीच्या बरगड्यांना, तर दुसऱ्या रुग्णाच्या डोक्याला दुखापत झाली होती. सीटीस्कॅन सेवा बंद असल्याने त्यांना पुढील तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर रुग्णांनी कुडाळ येथे खासगीरित्या सीटीस्कॅन करून घेतल्याने सुमारे ४० हजार रुपये खर्च झाल्याची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली.
सीटीस्कॅन मशीन बंद असल्याची माहिती मिळताच मसूरकर यांनी तातडीने संबंधित सीटीस्कॅन विभागाच्या कोल्हापूर येथील व्यवस्थापकांशी संपर्क साधून मशीनच्या बिघाडाची माहिती दिली. त्यानंतर मुंबईहून तंत्रज्ञाला पाचारण करण्यात आले. तपासणीत मशीनमधील एक्स-रे ट्यूब खराब झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बेंगळुरूहून नवीन एक्स-रे ट्यूब मागविण्यात आली.
बुधवारी सकाळी सुमारे नऊ वाजता बेंगळुरूहून एक्स-रे ट्यूब सावंतवाडीत दाखल झाली. त्यानंतर मुंबईहून आलेल्या तंत्रज्ञाने सुमारे सहा ते आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नवीन एक्स-रे ट्यूब सीटीस्कॅन मशीनमध्ये बसविली. बुधवारी रात्रीच मशीन पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून रुग्णांसाठी सीटीस्कॅनची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.
दरम्यान, सीटीस्कॅन सेवा बंद असताना ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याच्या स्वरूपाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने अशा प्रकारच्या खोडसाळ बातम्या देऊ नयेत, असे आवाहन राजू मसूरकर यांनी केले. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उपलब्ध साधनसामग्रीच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रविवारी खासगी रुग्णालयांमध्ये अनेकदा डॉक्टरांची उपलब्धता कमी असल्याने उपजिल्हा रुग्णालयावर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण येतो. ही बाब लक्षात घेऊन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने दर रविवारी अतिदक्षता विभागात सेवा देण्यासाठी तीन अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी प्रभारी अधीक्षक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत यांच्याकडे करण्यात आली होती. ही मागणी रास्त असल्याचे मान्य करून डॉ. सावंत यांनी तीन डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रविवारीही उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना अधिक चांगली वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होत असल्याचे मसूरकर यांनी सांगितले.
सीटीस्कॅन मशीनच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करून सेवा पूर्ववत करण्यात आली असून, रुग्णांच्या हितासाठी रुग्णालयातील सकारात्मक कामाची दखल घेऊन वस्तुस्थितीवर आधारित माहिती प्रसारित करावी, असे आवाहन राजू मसूरकर यांनी केले आहे.
