You are currently viewing भोपाळ येथे हवामान बदल संवाद कार्यक्रम संपन्न
Oplus_16908288

भोपाळ येथे हवामान बदल संवाद कार्यक्रम संपन्न

युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या मेगल डिसोजा यांचा सहभाग

मुंबई :

मुंबई येथील यूथ फॉर यूनिटी एंड वोलंटरी एक्शन (युवा) या संस्थेच्या वतीने भोपाळ येथील ‘मिट्टी का घर- मुस्कान स्थानिक संस्थाच्या वतीने हवामान बदल, युवकांचे प्रश्न व जागतिक हवामान शास्त्र या विषयावर “क्लाइमेट संवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शास्त्रज्ञ शेरीन एल. वॉटर (WGII, TSU, IPCC); डॉ. बार्ट वैन डेन हर्क (IPCC WG II Co-chair); ग्रेसेस चिंग (CLARE Project Coordinator) हे उपस्थित होते.

युवा संस्थेच्या दुलरी यांनी हवामान बदलावर चर्चा करताना सामान्य माणूस, श्रम करणारा कामगार यांच्यावर हवामानाचा कोणता परिणाम होतो हे त्यांच्याकडून जाणून घेऊन त्यांची मते आणि उपाय विचारात घेऊन धोरण निश्चित करावे अशी मांडणी केली .

जागतिक हवामान बदलाचा विचार केला तर global south या उपखंडाचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. विकसित देशात आधुनिक तंत्रज्ञान आहे. विकसित देशाने विकसनशील देशातील खनिजे, स्थानिक लोकांचे ज्ञान, श्रम यांचा अनेक वर्षे उपभोग घेऊन स्वतःचे तंत्रज्ञान विकसित केले. त्यांनी हे विकसित तंत्रज्ञान विकसनशील देशांना द्यायला हवे. त्यासाठी आर्थिक तरतूद असावी असे मत चर्चेत नोंदविले गेले.

हवामान बदलाचा धोका भविष्यात निर्माण होईल ही चिंता विकसित देशांना वाटते. परंतु आज विकसनशील देश मात्र प्रत्यक्षात हवामान बदलाचा परिणाम भोगत आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

आपले विचार मांडताना मेगल डिसोजा यांनी भारताला समृद्ध आणि मोठी किनारपट्टी लाभलेली आहे, मच्छीमारांचे जीवन समुद्राशी निगडित असून मासे हे उपजीविकेचे साधन आहे अशी मांडणी केली. मेगल ने सांगितला की : समुद्रावरून किनारपट्टीवर येणारे वारे ऋतूप्रमाणे बदलतात. किनाऱ्यावर शेवाळ लागतो. पाण्याचा रंग बदलतो. अशा अनेक गोष्टीवरून हवामानाचे अंदाज स्थानिक लोक सांगत असतात. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग हवामान बदलावरील धोरण ठरविताना करायला हवा. मच्छीमारांचे सण आणि परंपरा या वातावरण बदलाच्या अनुषंगानेच निश्चित केलेल्या आहेत. वातावरण बदलाचा परिणाम अर्थाजनावर होतोच तसा माणसाच्या आरोग्यावरही होत असतो. विकासाची संकल्पना उच्च रहाणीमान या एकाच तराजूत तोलली जाऊ नये. निसर्गाशी बांधिलकी ठेवून निसर्गाला पूरक माणसाचे जगणे असावे यालाच विकास असे म्हटले जावे अशी मांडणी त्यांनी केली.

या संवाद कार्यक्रमात यापुढे धोरण ठरवताना युवकांना सहभागी करून घ्यायला हवे यावर सर्वांचे एकमत झाले.

यावेळी हेरीन वोरा व दानिया डाबरे (वसई): शहेनशहा अन्सारी (अंबुजवाडी), अमित भालेराव (SCAC, महाराष्ट्र सरकार) रसिका वानखडे (अकोला), रोशनी नुग्गेहल्ली, नितीन मेश्राम आणि दुलरी परमार (युवा), ऐश्वर्या आयुष्मान व निविया जैन (HLRN), आरव व टीना (मुस्कान संस्था), NIAS संस्था येथील रिसर्चर : अंकिता रंजन, पीयूष प्रिया, संदीप महतो आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा