You are currently viewing हिंदोळ्यावर …
Oplus_16908288

हिंदोळ्यावर …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हिंदोळ्यावर …*

 

मला वाटते हिंदोळ्यावर सतत झुलावे बाई

दृष्टीसामोरी येते माझ्या श्रावणातली राई..

 

झुळझुळ वारे गारे गारे पवन देतसे झोका

असे वाटते गाण्यावरती द्यावा आपण ठेका..

 

पक्षी विहरती ललना गाती देवदर्शना जाती

नाजुक अशी ती परडी फुलांची असते त्यांच्या हाती..

 

बलाकमाला आभाळातून शुभ्र किती विहरती

राजा चालतो पुढे पुढे अन् नियमित त्यांची गती..

 

घंटानादे परिसर घुमतो, निनादतो पावन

फुलाफळांनी नटून येतो सुंदरसा श्रावण…

 

वेदमंत्र ते पोथीपुराणे भक्तिभाव बहरतो

मनमनातून श्रावण असा वेड पहा लावतो..

 

ललना नटती झोके घेती खुदुखुदु हासती

कसा आहे ग पती तुझा तो सांग गडे रेवती..

 

दु:ख मोकळे करण्या श्रावण हिंदोळे सोबती

कुणास सांगा चुकली आहे नियती कर्मगती..

 

श्रावणासवे हिरवे व्हावे, झुळझुळ झऱ्याच्या परी

निळ्यापरीसवे विहरून यावे पाहून घ्यावी दरी..

 

दऱ्यानिडोंगर साधूसम ते धुके पांघरून मुके

ऐश्वर्याची भूल पाडती दु:ख कुणाला चुके…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा