दावे व हरकतींवर सुनावणीदरम्यान सुलभ प्रक्रिया राबवा – भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत आढावा
सिंधुदुर्गनगरी
विशेष सखोल पुनरिक्षणात सर्वेक्षण प्रक्रियेनंतर प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी आणि ते निकाली काढण्याची प्रक्रिया 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पार पडणार आहे. यादरम्यान नागरिक व मतदारांना कोणत्याही प्रकारे अडचणी निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेत सर्व सुनावणी प्रक्रिया सुलभपणे राबवावी, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव एस. बी. जोशी आणि अजोय कुमार यांनी दिल्या.
त्यांनी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) बालाजी शेवाळे, मतदार नोंदणी अधिकारी, कणकवली जगदिश कातकर, मतदार नोंदणी अधिकारी, कुडाळ ऐश्वर्या काळुसे, मतदार नोंदणी अधिकारी, सावंतवाडी वीरसिंग वसावे यांच्यासह सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
मतदार यादीचा प्रारूप मसुदा 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन ते निकाली काढण्याची प्रक्रिया 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पार पडणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेबाबत प्रधान सचिवांनी विविध सूचना केल्या. प्रधान सचिव एस. बी. जोशी म्हणाले, जिल्ह्यातील एसआयआरबाबत ग्रामीण भागाचे प्रमाण जास्त असूनही समाधानकारक काम झाले आहे. युवकांच्या नोंदीही चांगल्या असून, अधिकारी आणि बीएलओंची मेहनत यामध्ये दिसून येत आहे. भविष्यातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी मतदारांचा विश्वास संपादन करीत चांगली मतदार यादी तयार करावी तसेच प्राप्त दावे व हरकती योग्य प्रकारे निकाली काढावेत.
प्रधान सचिव अजोय कुमार यांनी जिल्ह्यात अधिकारी आणि बीएलओ यांच्यात चांगला समन्वय असल्याचे सांगितले. तसेच एकसारखी नावे, दोन ठिकाणी असलेल्या नोंदी याबाबत बारकाईने तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
सुरुवातीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रधान सचिवांचे स्वागत करून माहिती देताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 6,88,014 मतदारांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण 6,05,426 फॉर्मचे यशस्वीपणे डिजिटायझेशन करण्यात आले असून, हे प्रमाण 88 टक्के आहे. उर्वरित फॉर्ममध्ये अनकलेक्टेड फॉर्म, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांच्या प्रवर्गाचा समावेश आहे. डिजिटायझेशन तसेच अनकलेक्टेड फॉर्मबाबतची कार्यवाही पूर्ण करून एकूण 100 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण व पुनर्रचना सध्या आवश्यक नसल्याचेही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.