*”आनंदवाडी मत्स्यबंदराचा होणार कायापालट”*
मंत्री नितेश राणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करणार बंदराची उद्या २१ ऑगस्ट रोजी पाहणी
*मत्स्यउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले राहणार उपस्थित
*बंदरातील कामाचा घेणार आढावा,आणि विकासकामांचे होणार सादरीकरण
*मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयामुळे अठरा वर्ष प्रलंबित असलेल्या आनंदवाडी बंदराला मिळणार ऊर्जिता अवस्था
देवगड:
आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासाला आता प्रत्यक्ष गती मिळाली असून जेटी, कार्यशाळा व गाळ काढण्याची कामे सुरू झाली आहेत. उर्वरित मासळी लिलावगृह, प्रशासकीय इमारत, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते आदी कामे येत्या १८ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष बंदराची पाहणी करून कामांचा आढावा घेणार आहेत.गेली अठरा वर्षे प्रलंबीत राहिलेल्या आनंदवाडी बंदराला पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्णयामुळे चालना मिळणार आहे.
देवगड तालुक्यातील आनंदवाडी येथील मत्स्यबंदराच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, जेटीचे बांधकाम, कार्यशाळा, जाळी विणण्याचे शेड आणि गाळ काढण्याची कामे महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळामार्फत सुरू आहेत. उर्वरित कामांनाही आता गती देण्यात येणार आहे.
मत्स्यबंदराच्या विकासांतर्गत मासळी लिलावगृह, प्रशासकीय इमारत, संरक्षक भिंत, पाण्याची टाकी, प्रसाधनगृह, अंतर्गत रस्ते, उपहारगृह, मच्छीमारांसाठी विश्रांतीगृह तसेच रेडिओ वॉरन कम्युनिकेशन सेंटर आदी कामांचा समावेश आहे.
या उर्वरित कामांचा आढावा घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता आनंदवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यावेळी महाराष्ट्र मत्स्यउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, कार्यकारी अभियंता कृष्णात निकम, प्रशासकीय अधिकारी किशोर साळगावकर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुंवेसकर आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
स्थळ पाहणीदरम्यान आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांबाबत सविस्तर आढावा व सादरीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, मत्स्यबंदराच्या विकासांतर्गत उर्वरित सर्व कामे १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्या अनुषंगाने बंदरातील कामाचा आढावा,आणि विकासकामांचे सादरीकरण केले जाणार आहे.
आनंदवाडी मत्स्यबंदराचा विकास पूर्ण झाल्यानंतर परिसरातील मच्छीमारांना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, मत्स्यव्यवसायाला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला सर्व मच्छीमार बांधव आणि ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
