सांगली (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगर पालिकेच्या वतीने यंदाचा श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त व प्रदूषणमुक्त पद्धतीने साजरा करण्यासाठी व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्रीम. संजिता महापात्र (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची आढावा व नियोजन बैठक पार पडली.
यंदा १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. आगामी वर्षापासून सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्ती, रासायनिक रंग आणि सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर पूर्ण बंदी आणण्यात येणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा सज्जड इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुख व विविध सामाजिक संस्थांची (NGOs) एक विशेष नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. बाजारात मिळणाऱ्या विषारी रंगांच्या व शाडू आणि POP मूर्तींऐवजी नागरिकांनी गोमय किवा शेतमातीची, गाळाच्या मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून मातीच्या मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
गणेशोत्सवातील सजावटीसाठी थर्माकोल आणि प्लास्टिक शीट्ससारख्या अविघटनशील साहित्याचा पर्यावरणावर दीर्घकालीन दुष्परिणाम होतो. त्यामुळे सजावटीत थर्माकोल व प्लास्टिक पूर्णपणे टाळून त्याऐवजी कागद, पुठ्ठा आणि कापड यांसारख्या नैसर्गिक व पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृत्रिम फुले सजावट ऐवजी नैसर्गिक फुलांचा सजावटी चा वापर करावा तसेच शैक्षणिक संस्थांमध्येही याविषयी विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
नैसर्गिक जलस्त्रोतांचे (नदी, विहिरी, तलाव) प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने शहरात विशेष नियोजन केले आहे.
महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालय क्षेत्रांत मैदाने, उद्याने, मोकळ्या जागा आणि मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या परिसरात मोठ्या संख्येने कृत्रिम तलाव व शेततळ्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या सर्व घरगुती व सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच नदीकाठी मानवी साखळी करून निर्माल्य नैसर्गिक जलस्रोतात न टाकता निर्माल्यासाठी तयार केलेल्या मंगल कलशामध्येच जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांना तसेच उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती विसर्जन वेळी ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी व लेझर लाईट चा वापर करू नये असे आवाहन देखील करण्यात येत आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस आयुक्त श्रीम. संजिता महापात्र, उपायुक्त श्रीम. स्मृती पाटील, उपायुक्त श्रीम. विद्या पाटील, उपायुक्त श्री. पराग कोडगुले, पर्यावरण अभियंता श्री. अजित गुजराथी, मुख्य स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी प्रशासन अधिकारी (शिक्षण विभाग) श्री. प्रकाश खेडकर, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी श्री. विनायक शिंदे यांच्यासह विविध सामाजिकसेवी संस्थांचे (NGOs) पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून, यंदाचा गणेशोत्सव अत्यंत आनंददायी, पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
