You are currently viewing “कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी पुढाकार; ₹१,३२० मध्ये ₹२५ लाखांचे अपघात विमा संरक्षण”

“कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी पुढाकार; ₹१,३२० मध्ये ₹२५ लाखांचे अपघात विमा संरक्षण”

“कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी पुढाकार; ₹१,३२० मध्ये ₹२५ लाखांचे अपघात विमा संरक्षण”

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या पुढाकाराने अपघात विमा व आधार अपडेट शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी

सावंतवाडी येथील उभा बाजार, सुवर्णपेठ परिसरातील जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या कार्यालयात पोस्ट खात्यामार्फत अपघात विमा व आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक युवक-युवती तसेच नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत अपघात विमा काढून घेतला.

या शिबिरासाठी सावंतवाडी पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर प्रकाश गावडे व उपपोस्टमास्तर जयराम बावलेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर (राजू) मसुरकर यांनी पोस्ट खात्याच्या अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

₹१,३२० वार्षिक प्रीमियममध्ये विविध लाभ

पोस्ट खात्यामार्फत उपलब्ध असलेल्या अपघात विमा योजनेमध्ये वार्षिक ₹१,३२० प्रीमियममध्ये ₹२५ लाखांपर्यंतचे अपघाती संरक्षण उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अपघाती मृत्यू झाल्यास वारसदार/नॉमिनीला ₹२५ लाखांपर्यंत लाभ

कायमस्वरूपी अपंगत्वासाठी ₹२५ लाखांपर्यंत संरक्षण

मुलांच्या शिक्षणासाठी ₹१ लाखांपर्यंत लाभ

शस्त्रक्रियेसाठी ₹१.५० लाखांपर्यंत खर्च

ICU उपचारासाठी १५ दिवसांपर्यंत प्रतिदिन ₹२,०००

सामान्य रूम व केअरटेकरसाठी ३० दिवसांपर्यंत प्रतिदिन ₹१,०००
या योजनेसाठी साधारणतः १८ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना प्रवेश असून आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड व पॅन कार्ड अथवा मतदान कार्डाची आवश्यकता असल्याची माहिती देण्यात आली.

आधार अपडेटचीही सुविधा

शिबिरात अपघात विम्यासोबतच आधार कार्ड अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विमा तसेच आधार अपडेटची सुविधा मिळाली.

₹७५५ मध्ये NIVA BUPA अपघात विमा योजना

याशिवाय इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ग्राहकांसाठी NIVA BUPA ची ₹७५५ वार्षिक प्रीमियमची अपघात विमा योजना उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. या योजनेत ₹१५ लाखांपर्यंत अपघाती मृत्यू व कायमस्वरूपी अपंगत्वाचे संरक्षण, वैद्यकीय प्रतिपूर्ती, हाडे फ्रॅक्चर, भाजणे, बालशिक्षण लाभ तसेच रुग्णालयातील दैनिक रोख लाभ यांसारख्या सुविधा असल्याचे सांगण्यात आले.

या योजनेचा कालावधी एक वर्ष असून प्रवेशाचे वय १८ ते ६५ वर्षे आहे. वार्षिक प्रीमियम ₹७५५ असून तो साधारण दररोज दोन रुपयांपेक्षाही कमी खर्चात उपलब्ध होतो.

“अपघात कधीही येऊ शकतो; कुटुंबाच्या भवितव्यासाठी संरक्षण आवश्यक”

राजू मसुरकर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “अपघात कधीही होऊ शकतो. वर्षाला ₹१,३२० म्हणजे महिन्याला साधारण ₹११० इतका खर्च होतो. आपल्या पत्नी, मुलांचे आणि कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी अपघात विमा घेणे आवश्यक आहे. अपघातामुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळू नये, यासाठी प्रत्येकाने वेळीच विमा संरक्षण घ्यावे.”

पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार सुविधा

या विमा योजनांची अधिक माहिती व विमा काढण्यासाठी नागरिकांनी देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. विम्याच्या नूतनीकरणासाठी मुदत संपण्यापूर्वी मोबाईलवर संदेश प्राप्त होतो आणि उपलब्ध सुविधेनुसार डिजिटल पद्धतीने नूतनीकरण करता येते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पोस्टमास्तर प्रकाश गावडे, उपपोस्टमास्तर जयराम बावलेकर व संपूर्ण पोस्ट स्टाफ यांचे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले.
संपर्क : राजू मसुरकर – ९४२२४३५७६०

प्रतिक्रिया व्यक्त करा