You are currently viewing जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन :  प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन :  प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन :  प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे

‘जबाबदार नागरिक – सुरक्षित नागरिक’, ‘जबाबदार पर्यटक – सुरक्षित पर्यटन’

सिंधुदुर्गनगरी

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून कालावधी सुरू असून जिल्ह्यातील सर्व नद्या, तलाव व ओहोळ तुडुंब भरलेले आहेत. धरणांची पाणीपातळी वाढलेली असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित नद्यांच्या पाणीपातळीत तसेच प्रवाहाच्या वेगात वाढ होत आहे. मान्सून कालावधी असल्याने समुद्रही खवळलेला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष दक्षता बाळगणे आवश्यक आहे.

मान्सून कालावधीच्या अनुषंगाने आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी जिल्हा, तालुका व ग्राम प्रशासनाच्या वतीने मान्सूनपूर्व आढावा बैठका घेण्यात आलेल्या आहेत. शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवण्यात आलेले आहे. जिल्हा, तालुका तसेच विविध प्रशासकीय विभागांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचे ग्राम आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करण्यात आले असून, ग्रामपंचायतींनी शोध व बचाव साहित्य उपलब्ध करून ठेवले आहे.

जिल्ह्यातील ११० दरडप्रवण गावांमधील प्रशासकीय यंत्रणांना दरड जाणीवजागृती प्रशिक्षण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत देण्यात आलेले आहे. तहसील स्तरावर व पोलीस स्टेशन स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या बोटींचे हाताळणी प्रशिक्षण NDRF पथकामार्फत संबंधित अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांना देण्यात आलेले आहे. तसेच NDRF पथकामार्फत जिल्ह्यातील माध्यमिक शाळा, महिला बचत गट, पूरप्रवण व दरडप्रवण गावांतील नागरिक आणि स्वयंसेवक यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मान्सून कालावधीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत.

हवामान विभागाकडून पूर्वसूचना प्राप्त होताच पूर्वसूचनेबाबत प्रेस नोट काढून संबंधित विभागांना व नागरिकांना माहिती प्रसारित केली जाते. प्रशासकीय समन्वयासाठी जिल्हा व तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत विविध व्हॉट्सऍप गट स्थापन करण्यात आलेले आहेत. सदर गटांमार्फत हवामानविषयक इशारे, नद्यांची दैनंदिन पाणीपातळी, धरणातून सोडण्यात येणारे पाणी आदींबाबतची माहिती संबंधित प्रशासकीय विभागांना देऊन त्यांना सतर्क ठेवण्यात येते. जिल्ह्यात घडणाऱ्या विविध आपत्तींना संबंधित विभागांनी कसा प्रतिसाद द्यावा, यासाठी प्रत्येक विभागाची प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात आलेली आहे. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी जलसंपदा विभागाकडून जाहीर प्रकटनाद्वारे संबंधित गावातील प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्क करण्यात येते. तसेच वादळी हवामान असताना मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, यासाठी त्यांना वेळोवेळी सतर्क करण्यात येते.

मात्र, प्रशासनामार्फत विविध उपाययोजना व पूर्वसूचना देण्यात येऊनही जिल्ह्यात विविध ठिकाणी दुर्दैवी दुर्घटना घडत आहेत. यामध्ये धरणाच्या पाण्यात बुडून ०३ मुलींचा मृत्यू, विविध घटनांमध्ये तारकर्ली व मिठमुंबरी येथील समुद्रात अंघोळीसाठी गेलेल्या ०२ पर्यटकांचा बुडून मृत्यू, मासेमारीसाठी गेलेल्या ०२ व्यक्तींचा बुडून मृत्यू, मान्सून कालावधीत मासेमारीसाठी गेलेल्या ०३ मच्छिमारांचा बुडून मृत्यू, संरक्षक रेलिंग ओलांडून गेल्याने एका पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू तसेच नदी अथवा वहाळीत पडून ०३ व्यक्तींचा मृत्यू अशा घटनांचा समावेश आहे.

तसेच, दि.१७ ऑगस्ट २०२६ रोजी दोडामार्ग तालुक्यातील घोडगेवाडी-कोनाळ येथे तिलारी नदीचा कॉजवे पार करताना ०८ वर्षीय मुलगा व २५ वर्षीय युवक नदीत पडून बुडून मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मे २०२६ ते दि. १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध घटनांमध्ये एकूण १६ व्यक्तींनी आपला जीव गमावलेला आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी, पर्यटकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक ठरते.

भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत नागरिकांना, पर्यटकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.

१) नागरिकांनी मान्सून कालावधीत तसेच इतर वेळीही नदी, समुद्र, धबधबे, डोंगर-दऱ्या, तलाव, धरणे आदी ठिकाणी पर्यटनासाठी जाताना ‘जबाबदार पर्यटक – सुरक्षित पर्यटन’ या संकल्पनेचा अवलंब करावा. ज्या ठिकाणी जाण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आलेली आहे किंवा जी ठिकाणे धोकादायक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत, अशा ठिकाणी नागरिकांनी, पर्यटकांनी कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करू नये. स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रतिबंधित अथवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे.

२) समुद्र खवळलेला असताना मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. प्रशासन व संबंधित विभागांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

३) समुद्र खवळलेला असताना नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये अथवा पोहण्याचा प्रयत्न करू नये.

४) धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याबाबत पूर्वसूचना देण्यात आलेली असल्यास नदीपात्रातील पाण्याची पातळी व प्रवाहाचा वेग वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पुलावर, कॉजवेवर अथवा रस्त्यावरून पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत सदर पूल अथवा कॉजवे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.

५) धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत जलसंपदा विभागामार्फत वेळोवेळी पूर्वसूचना देण्यात येते. नदीपात्रातील पाण्याची पातळी व प्रवाहाचा वेग वाढलेला असताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, गुरे चारण्यासाठी अथवा पाणी पाजण्यासाठी नदीपात्रात जाणारे शेतकरी व इतर नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात प्रवेश करून आपला जीव धोक्यात घालू नये.

६) हवामान विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या हवामानविषयक तसेच आपत्तीविषयक पूर्वसूचनांचे नागरिकांनी गांभीर्याने पालन करावे. सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे व अधिकृत यंत्रणांमार्फत प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये.

७) संरक्षक रेलिंग ओलांडून सेल्फी काढणे, पुराच्या पाण्यातून वाहने चालवणे, पुराच्या पाण्यात सेल्फी काढणे अथवा अशा प्रकारच्या धोकादायक कृती करणे जीवितास धोका पोहोचविणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी, पर्यटकांनी अशा कृती कटाक्षाने टाळाव्यात.

८) कोणत्याही बाबीपेक्षा मानव व प्राणी यांच्या जीवितास सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची तसेच आपल्या कुटुंबीयांची सुरक्षितता प्रथम सुनिश्चित करावी आणि धोकादायक ठिकाणी जाणे अथवा प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन करणे टाळावे.

९) नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नयेत. प्राप्त झालेल्या कोणत्याही बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२-२२८८४७), टोल फ्री क्रमांक १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा.

‘जबाबदार नागरिक – सुरक्षित नागरिक’, ‘जबाबदार पर्यटक – सुरक्षित पर्यटन’

नागरिकांनी व पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ‘जबाबदार नागरिक – सुरक्षित नागरिक’ आणि ‘जबाबदार पर्यटक – सुरक्षित पर्यटन’ या संकल्पनांचा अवलंब करून स्वतःची, आपल्या कुटुंबीयांची तसेच इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा