You are currently viewing रील’पासून वॉकेथॉनपर्यंत; सिंधुदुर्गात जलसंधारणाचा जागर

रील’पासून वॉकेथॉनपर्यंत; सिंधुदुर्गात जलसंधारणाचा जागर

रीलपासून वॉकेथॉनपर्यंतसिंधुदुर्गात जलसंधारणाचा जागर

माती आणि पाणी ही पुढील पिढ्यांची अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. बदलते हवामान, पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि वाढती पाण्याची गरज या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याची गरज आहे. याच उद्देशाने १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येत असून, सिंधुदुर्गात डिजिटल माध्यमांपासून प्रत्यक्ष जनसहभागापर्यंत विविध उपक्रम राबविले जात आहेत.

युवकांच्या कल्पकतेला जलसंधारणाच्या संदेशाशी जोडण्यासाठी ‘Reel for Soil & Water Conservation’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करून माती संवर्धन, पाणी बचत, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण यांसारख्या विषयांवर जनजागृती करता येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी २५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून, विजेत्यांचा ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून गौरव केला जाणार आहे.

सोशल मीडियावरून संदेश पोहोचविण्याबरोबरच नागरिकांना प्रत्यक्ष कृतीशी जोडण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी ५.३० वाजता पोलीस परेड ग्राऊंडपासून वॉकेथॉनला सुरुवात होईल. डॉन बॉस्को सर्कल, जिल्हा परिषद मुख्य गेट, जिल्हा रुग्णालय, नर्सिंग कॉलेज मार्गे पुन्हा पोलीस परेड ग्राऊंड येथे वॉकेथॉनची सांगता होणार आहे. कमाल तीन किलोमीटरच्या या उपक्रमात १५ वर्षे व त्यावरील महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात.

वॉकेथॉनमध्ये सहभागी प्रत्येकाला टी-शर्ट व ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून, मृद व जलसंधारणाची शपथही घेतली जाणार आहे. ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाचे पाणी अडविणे-जिरविणे, जलस्रोतांचे संवर्धन आणि मातीची धूप रोखणे याबाबत जागृती करणे, हा या उपक्रमांचा उद्देश आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून वॉकेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

सिंधुदुर्गची हिरवाई, मुबलक पाऊस आणि नैसर्गिक जलस्रोत ही जिल्ह्याची मोठी संपत्ती आहे. मात्र, ही संपत्ती भविष्यासाठी टिकविण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहभागाची जोड आवश्यक आहे. ‘एक Reel… मातीसाठी! एक पाऊल… पाण्यासाठी!’ या भावनेतून युवक, विद्यार्थी, महिला, अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी जलसंधारण सप्ताहातील उपक्रमांत सहभागी व्हावे. डिजिटल माध्यमातून जनजागृती आणि प्रत्यक्ष सहभागाची सांगड घालणारा हा उपक्रम जलसंधारणाला लोकचळवळीचे रूप देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो.

अधिक माहितीसाठी- https://register.mahaevent.co.in

                                    – जिल्हा माहिती कार्यालयसिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा