You are currently viewing हा रंगरंगिला…
Oplus_16908288

हा रंगरंगिला…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हा रंगरंगिला…*

 

हा रंगरंगीला श्रावण भुलवी मजला

अरे ए, श्रावणा विविध तुझ्या रे लीला

तू येतो भुरभुर रोज भिजवतो मजला

तू अवखळ आहे खरोखर रे मुला..

 

तू पानापानांतून खट्याळ का रे हसतो

दवबिंदूतून तू छान किती रे दिसतो

मिचकावून डोळे गवतावर तू मस्त

मातीत लोळतो होऊन जातो सुस्त..

 

तव झरझर धारा तोषविती मातीला

श्रावणा तुझ्यारे असती विविध लीला

तू फुलाफळातून असा काही दरवळतो

रे बा श्रावणा, तू खूप मला आवडतो..

 

ती फुलाफुलांची वेलींची लगबग घाई

किती सुंदर दिसतो श्रावणा तू ठायी ठायी

तू शेतातूनही असा टरारून येतो

ज्वारी नि बाजरी कपाशीही फुलवितो..

 

अवकाशी रंग इंद्रधनू खुलवितो

पाऊस उन्हात तू मस्तच नाचत येतो

किती वर्णाव्या रे विविध तुझ्या त्या लीला

सौंदर्यच आहे फक्त तुझ्या राशीला..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा