You are currently viewing स्वातंत्र्यदिनी घारपी शाळेत व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी विद्यार्थी व ग्रामस्थांनी शपथ घेत केला सामूहिक संकल्प

स्वातंत्र्यदिनी घारपी शाळेत व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी विद्यार्थी व ग्रामस्थांनी शपथ घेत केला सामूहिक संकल्प

स्वातंत्र्यदिनी घारपी शाळेत व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी विद्यार्थी व ग्रामस्थांनी शपथ घेत केला सामूहिक संकल्प

*बांदा*

स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त होणे नव्हे, तर समाजाला विळखा घालणाऱ्या व्यसनांच्या गुलामगिरीतूनही मुक्त होणे होय. याच विचारातून भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यसनमुक्तीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली.
स्वातंत्र्यदिनाच्या पावन वातावरणात तिरंग्याला साक्षी ठेवून विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा तसेच आपल्या कुटुंबात, गावात आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा निर्धार केला. ही व्यसनमुक्तीची शपथ सहकारी शिक्षक श्री. धर्मराज खंडागळे यांनी उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना दिली.
व्यसन हे केवळ व्यक्तीचे नुकसान करत नाही, तर त्याची झळ संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला बसते. व्यसनामुळे आरोग्य, कौटुंबिक सुख आणि सामाजिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर व्यसनमुक्त जीवनाचे संस्कार रुजविणे आणि समाजालाही या चळवळीत सहभागी करून घेणे ही काळाची गरज आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, आरोग्यावर होणारे परिणाम आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनमुक्त समाज—समृद्ध महाराष्ट्र’ अशा संदेशांनी शाळेचा परिसर भारावून गेला.
या उपक्रमावेळी मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र गावकर, उपाध्यक्ष श्री. संतोष कविटकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. आनंद गावडे, शिक्षणप्रेमी सदस्य विजय गावकर, पोलिस पाटील समृद्धी गावडे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, आशा सेविका उत्तरा नाईक यांच्यासह गावातील तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घारपीसारख्या दुर्गम भागातील शाळेत विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतलेली ही शपथ केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता कुटुंबापासून गावापर्यंत आणि गावापासून संपूर्ण समाजापर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविणारी ठरावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असतानाच व्यसनांच्या गुलामगिरीपासून मुक्त होण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला. त्यामुळे हा उपक्रम स्वातंत्र्याची व्यापक संकल्पना अधोरेखित करणारा ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा