ओसरगाव अपघातातील धाडसी रेस्क्यू पथकाचा पडवे येथे विशेष सत्कार
दोन-तीन तासांच्या अथक प्रयत्नांत मिनीबस चालकासह सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका
पडवे
चार-पाच दिवसांपूर्वी ओसरगाव टोलनाक्यावर मिनीबसचा ट्रकला धडकून भीषण अपघात झाला होता. या अपघातात मिनीबसचा चालक कमरेखालील भागात दोन्ही पाय अडकून गंभीर परिस्थितीत अडकला होता. अपघातानंतर तब्बल दोन ते तीन तास सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अक्षय राणे, उदय शिर्के, बबली राणे, राजेंद्र देसाई, संजय हिरलेकर, प्रवीण यादव आणि साहिल शंकरदास यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.
जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्न करत या पथकाने चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याबरोबरच मिनीबस मधील सर्व प्रवाशांचीही सुखरूप सुटका करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या धाडसी आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने पडवे शाळेत विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी महामार्ग पोलीस सुरक्षा पथक, रत्नागिरी विभागाच्या पोलीस निरीक्षक दीपाली जाधव, PSI जयराम पाटील, PSI संजय फाले, ASI प्रकाश गवस, नितीन शेट्ये, सागर परब, पांडुरंग खडपकर, रेशमा देसाई आणि मीनाक्षी धुरी आदी उपस्थित होते.
अपघाताच्या वेळी तातडीने घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न आणि प्रवाशांच्या सुटकेसाठी दाखवलेले धैर्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. संकटाच्या प्रसंगी माणुसकीच्या भावनेतून मदतीसाठी धावून जाणाऱ्या या सर्वांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला.
या सत्कारामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सर्वांच्या धाडसी कार्याला योग्य सन्मान मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
