You are currently viewing आठवणीतली संध्याकाळ…
Oplus_16908288

आठवणीतली संध्याकाळ…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*आठवणीतली संध्याकाळ..*

 

सन १९६६/६७. एस एस व्ही पी एस महाविद्यालय धुळे. ११ वी नंतर मी एस एस व्ही

पी एस महाविद्यालयात धुळे येथे पी डी आर्ट्सला

ॲडमिशन घेतली होती. आम्ही होस्टेलच्या चार

मैत्रिणी कायम बरोबर रहात असू. तशा आम्ही

खेड्यातल्या अत्यंत बावळट व बुजऱ्या मुली होतो. बसने देखील प्रवास करत नव्हतो कारण

शेजारी मुलगा येऊन बसला तर? दररोज लेफ्ट

राईट करत अर्धातास पायी, दोन्हीकडून पायपीट

करत कॅालेजला जात होतो व येत होतो.

 

आम्ही इतक्या भित्र्या होतो की, कॅालेजच्या गॅदरिंगला सुद्धा गेलो नाही. संध्याकाळी फिशपॅांण्डचा कार्यक्रम खाली कॅालेजच्या मोकळ्या मैदानात होता. ना स फरांदे सर होते.

कार्यक्रम खूप जोरात, हसत-खेळत टाळ्यांच्या

गजरात, संध्याकाळच्या कोवळ्या किरणात धमाकेदार असा चालू असलेला आम्हाला होस्टेलवरून ऐकू येत होता (कारण आम्ही कॅालेजच्या होस्टेलला शिफ्ट झालो होतो)

तरी आम्ही खाली उतरलो नाही. हे झाले पहिले

वर्ष.

 

नंतर एफ वायला मात्र ॲाडिटोरियममधील गाण्यांचा कार्यक्रम आम्ही अटेंड केला. पण

तत्पूर्वी संध्याकाळी कॅालेजच्या पाठीमागे पांझरा

नदी वाहते त्या बाजूला कधी नव्हे त्या आम्ही मैत्रिणी फिरायला गेलो नि मी तर स्तब्धच झाले.

कारण नदी परीसरात एवढी विस्तीर्ण ऐसपैस जागा व सुंदर परिसर आहे हे आम्हाला माहीतच

नव्हते.शांत, प्रसन्न वातावरण, झुळझुळ वाहणारी भरपूर पाणी असलेली नदी. सुंदर हिरवीगार झाडी, आणि त्या नंतर मी सहजच वर

आकाशात पाहिले तर.. माझा माझ्या डोळ्यांवर

विश्वासच बसेना.

 

सायंकाळची ती सोन्याने मढवलेली किरणे हिरव्या झाडांवर सोन्याचा वर्षाव करीत होती.

मंद मंद थंडगार हवा झुळझुळू वहात होती. अनेक प्रकारचे पक्षी विहरत होते. अनेक बदके

शुभ्र पोषाख घालून पाण्यावर अलगद तरंगत

आनंदविहार करत होते. सूर्यदेव हे सारे पहात

खुष होत आपला सोनेरी वर्षाव अधिकअधिक

करत आपल्या आवडत्या भल्यामोठ्या पहाडाकडे निघाले होते व त्यांच्या रंगछटा अधिक अधिक गडद होत आसमंतात रंगांच्या

घागरी ओतत होत्या. कोणते रंग नव्हते त्यात?

लालपिवळाहिरवानिळागुलाबीकेशरीपांढरा करडाकाळा… अबबबबबबब! सारे रंग एकात

एक मिसळून त्यात सूर्य प्रभा मिसळून रंगांची

अशी काही अनोखी रांगोळी निर्माण झाली होती

की, या आकाशातल्या रंगाऱ्याचे कौतुक करावे

तेवढे थोडेच होते! अविस्मरणीय असे ते दृश्य पाहून त्यावेळी जर मी कवी असते तर.. ही सारी

किमया मी नक्कीच शब्दबद्ध केली असती यात

शंकाच नाही.

 

ही एकमेव अविस्मरणीय संध्याकाळ माझ्या मनावर अशी काही कोरली गेली आहे कि आजतागायत ती माझ्या डोळ्यात बंदिस्त आहे,

जी आज तुमच्या पुढ्यात मी उलगडली आहे.

माणसाच्या जीवनात असा प्रसंग कधी कधी

कोरला जातो व आजीवन त्याची साथ करतो

अशी ती संध्याकाळ आहे जी मी अजून उघड्या

डोळ्यांनी बघते आहे. ते अनमोल दृश्य सोडून आम्ही ॲाडिटोरियम मध्ये प्रवेश करताच त्यावेळी गाजत असलेल्या धर्मेंद्र मीनाकुमारीच्या

गाजलेल्या गाण्याचे सूर कानावर पडले..

“ हमसफर मेरे हम सफर” कॅालेजची एक तरूणी

व तरुण गात होते नि सारी तरूणाई धुंद होऊन

टाळ्याशिट्या वाजवत गाण्याचा आनंद लुटत होती. नुकतेच डोळ्यात साठवलेले ते सुंदर दृश्य

व आता बेधुंदपणे डोलणारा तो समुदाय पाहून

आम्ही अंगचोरून कोपऱ्यात बसून ते गाणे ऐकत

मीनाकुमारी व धर्मेंद्रला पहात खुश होत होतो.

तर.. अशी होती ती संध्याकाळ.. रमणीय, सर्वार्थाने अविस्मरणीय!

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा