You are currently viewing समाजोपयोगी कार्याचा गौरव; जिल्हा युवा पुरस्कार २०२४-२५ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; जिल्हा युवा पुरस्कार २०२४-२५ जाहीर

सिंधुदुर्गनगरी :

युवकांमधील सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजोपयोगी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार सन २०२४-२५ जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय युवा पुरस्कार समितीच्या बैठकीत युवक, युवती आणि संस्था या तीन प्रवर्गांतील पुरस्कारार्थींची छाननी, गुणांकन व चर्चेनंतर सर्वानुमते निवड करण्यात आली.

या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते. एकूण ८ प्रस्ताव प्राप्त झाले. यामध्ये ४ संस्था, २ युवक आणि २ युवतींचे प्रस्ताव होते. प्राप्त प्रस्तावांची समितीमार्फत छाननी करून पात्र पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली.

युवक प्रवर्गात मिरवडे, ता. सावंतवाडी येथील जयराम आत्माराम जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि मानवतावादी क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य केले आहे. गरजू व वंचित घटकांसाठी आरोग्य शिबिरे, रक्तदान जनजागृती, औषधे व जीवनावश्यक साहित्याचे वितरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमांतून त्यांनी समाजसेवेचा ठसा उमटविला आहे. युवकांना सामाजिक कार्याशी जोडण्याबरोबरच सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या बहुआयामी कार्याची दखल घेऊन त्यांची युवक प्रवर्गातून निवड करण्यात आली आहे.

युवती प्रवर्गात कोलगाव, ता. सावंतवाडी येथील फिजा अब्दुल मकानदार यांची निवड झाली आहे. त्यांनी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, कला आणि आरोग्य क्षेत्रात कार्य केले आहे. मोफत आरोग्य शिबिरे, महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान, वृक्षारोपण, युवा नेतृत्व व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, तंबाखूविरोधी उपक्रम तसेच अनुसूचित जाती व जमातींबाबत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची युवती प्रवर्गातून निवड करण्यात आली आहे.

संस्था प्रवर्गात ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग’ यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेने शिक्षण, महिला सक्षमीकरण, समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य, आपत्ती व्यवस्थापन, युवा, पर्यावरण, आरोग्य तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. विविध समाजोपयोगी क्षेत्रांमध्ये सातत्याने केलेल्या बहुआयामी व व्यापक कार्याची दखल घेत संस्थेची संस्था प्रवर्गातून निवड करण्यात आली आहे.

पुरस्काराचे स्वरूप : युवक आणि युवती प्रवर्गातील पुरस्कारार्थींना गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम रुपये १० हजार, तर संस्था प्रवर्गातील पुरस्कारार्थी संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम रुपये ५० हजार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे वितरण स्वातंत्र्य दिनी, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस कवायत मैदान, ओरोस, सिंधुदुर्ग येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवक, युवती आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या कार्यातून इतर युवकांना प्रेरणा मिळावी, हा जिल्हा युवा पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे.

बैठकीस क्रीडा व युवक उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांच्यासह जिल्हास्तरीय युवा पुरस्कार समितीचे सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा