You are currently viewing जलक्रीडा व्यवसायासाठी अधिकृत नोंदणी व सुरक्षेचे नियम बंधनकारक : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जलक्रीडा व्यवसायासाठी अधिकृत नोंदणी व सुरक्षेचे नियम बंधनकारक : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

*जलक्रीडा हंगाम 2026-27 पूर्वी संयुक्त मार्गदर्शन कार्यशाळा*

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जलक्रीडा हंगामाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील जलक्रीडा पर्यटन अधिकृत, सुरक्षित आणि नियमबद्ध चालवण्यासाठी सर्व व्यावसायिकांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात आयोजित जलक्रीडा हंगाम 2026-27 पूर्वी संयुक्त मार्गदर्शन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, सागरी सुरक्षा शाखा पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार, जल क्रीडा व्यावसायिकांसह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक रोजगाराला गती मिळाली असली तरी सागरी किनारपट्टीवरील अपघातांचा धोका लक्षात घेता पर्यटकांची सुरक्षा हीच प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अवैध जलक्रीडा व्यवसाय चालवू दिला जाणार नाही. सर्व व्यावसायिकांनी नियमावलीनुसार कागदपत्रे सादर करून व निश्चित शुल्क भरून अधिकृत नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. नोंदणीमुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचवणे शक्य होईल आणि पर्यटकांची फसवणूक टळेल.

कार्यशाळेत विविध प्रशासकीय विभागांमार्फत जलक्रीडा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापन व समन्वयावर भर दिला, तर मेरीटाइम बोर्डाकडून बोटींची नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र आणि सुरक्षा उपकरणांची अनिवार्यता स्पष्ट करण्यात आली. पोलीस विभागाने सुरक्षेच्या व अनधिकृत व्यावसायिकांवरील कारवाईच्या सूचना दिल्या, तसेच पर्यटन संचालनालयाने ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले.

या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी कायदा आणि सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच अनुपस्थित व्यावसायिकांपर्यंत नियमावली पोहोचवण्यासाठी आणि हवामानाचे इशारे वेळेवर मिळण्यासाठी जलक्रीडा व्यावसायिकांचा संपर्क डेटाबेस तयार करून अधिकृत व्हॉट्सॲप समूह तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी हंगामात सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी आपत्तीविषयक मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा